रत्नागिरी - राज्यातील महाविद्यालये लवकरच सुरू होतील. सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंना याबाबत सूचना देण्यात आल्या आहेत, येत्या आठ दिवसांत त्याबाबत अहवाल तयार होईल. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी तयारीत राहावे असे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी म्हटले आहे. दरम्यान, अहवाल आल्यानंतर तो मुख्यमंत्र्यांना दाखवला जाईल आणि त्यांच्या आदेशान्वये किती टक्के फिजिकली प्रेझेंटीवर महाविद्यालय सुरू करायची त्याबाबतचा निर्णय घेतला जाईल. त्यामुळे कॉलेज आता सुरू होणार या मानसिकतेमध्ये विद्यार्थी आणि पालकांनी राहावे असे सामंत यांनी स्पष्ट केले आहे.
मागील वर्षी परिक्षा ऑनलाईनच -
गेल्या वर्षभरापासून कोरोनामुळे लॉकडाऊन होता. राज्यातील उद्योग, धंदे, व्यापार, शाळा, महाविद्यालये, मंदिरे ही बंद होते. लाखो लोक यामुळे बेरोजगार झाले. अनेकांवर यामुळे उपासमारीची पाळी आली. पहिल्या लाटेत महाविद्यालये बंद करण्यात आली होती. दरम्यान ज्या ठिकाणी ऑनलाईन वर्ग घेण्याची सुविधा होती त्या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने वर्ग घेण्यात आले आणि महाविद्यालयीन परीक्षा घेण्यात आला. तर काही ठिकाणी सर्व विद्यार्थांना थेट पुढील सत्रात प्रवेश देण्यात आला होता. दुसऱ्या लाटेतही मोठ्या प्रमाणात अभ्यासक्रम हा ऑनलाईन पद्धतीनेच शिकवण्यात आला होता. सर्वच महाविद्यालयांच्या परिक्षाही ऑनलाईन पद्धतीनेच घेण्यात आल्या होता.
तज्ज्ञांनी दिला सल्ला -
तब्बल दीड वर्ष उच्च शिक्षणापासून कमी अधिक प्रमाणात दूर गेलेल्या विद्यार्थांना पुन्हा महाविद्यालयात आणणे हे प्रशासनासाठी मोठ्या जिकीरीचे काम असणार आहे. तसेच येत्या काळात महाविद्यालय लवकरच सुरू करण्यात येणार आहेत. त्यामुळे महाविद्यालयात कोरोनाच्या नियमांची काळजी घेणे आणि त्यांचे योग्य पद्धतीने पालन करणे हे देखील गरजेचे आहे. प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे महाविद्यालयात काटेकोरपणे पालन झाल्यास संभाव्य कोरोनाच्या तिसऱ्या लाटीपासून महाविद्यालयीन तरूण बचावतील, अशी शक्यता तज्ज्ञांकडून वर्तवण्यात येत होती.
लवकरच मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने निर्णय -
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकताच राज्यातील शाळा 4 ऑक्टोबरपासून सुरू करण्यात परवानगी दिली तर चित्रपटगृहे आणि नाट्यगृहे २२ ऑक्टोबरपासून आरोग्याचे नियम पाळून खुली करण्यास परवानगी देण्यात आली आहे. दरम्यान राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांशी बोलताना सांगितले की, महाविद्यालयेही लवकरच सुरू होणार आहेत. यासाठी अहवाल तयार केला जात आहे. अहवाल तयार झाला की मुख्यमंत्र्यांच्या परवानगीने महाविद्यालये खुली करण्याचा निर्णय घेण्यात येईल अशी माहिती सामंत यांनी दिली आहे.
हेही वाचा - राज्यातील चित्रपटगृहे, नाट्यगृहे 22 ऑक्टोबरपासून सुरू होणार