रायगड - 2020 साल हे कोळी बांधवांसाठी आर्थिक अडचणीत गेले. त्यातच झालेल्या निसर्ग चक्रीवादळात कोळी बांधव हा उध्वस्त झाला. मात्र राज्य शासनाने कोळी बांधवांची क्रूर चेष्टा केली. तसेच कोळी बांधवांना राज्य सरकारने मदत न करता ठेंगा दाखविला, असा आरोप विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केला. राज्यातील आगामी सर्व निवडणुका भाजप स्वबळावर लढणार असल्याचेही फडणवीस यावेळी म्हणाले.
कोळी बांधवांना साहित्याचे वाटप-
कोळी महसंघातर्फे कोळी बांधवांना साहित्याचे वाटप कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी माजी मुख्यमंत्री, विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस उपस्थित होते. त्यांनी प्रातिनिधीक स्वरूपात साहित्याचे वाटप केले. त्यानंतर आयोजकांनी उर्वरित साहित्य वाटप केले.
राज्य सरकारने कोळी बांधवांना दाखविला ठेंगा-
कोळी बांधवांना 2020 हे साल हलाखीचे गेले आहे. मार्चपासून आलेल्या कोरोनामुळे कोळी बांधव आधीच मेटाकुटीस आला असताना 'निसर्गा'ने पुन्हा कोलमडून गेला. निसर्ग चक्रीवादळात कोळी बांधवांच्या बोटी, जाळी याचे अतोनात नुकसान झाले. राज्य शासनाने करोडो रुपये निधी कोळी बांधवांसाठी मंजूर केला. मात्र अद्यापही तो पोहचलेला नाही. त्यामुळे राज्य शासनाने कोळी बांधवांना ठेंगा दाखविला आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.
जस्टीस हरिदास कमिटीचा अहवाल राज्य शासनाने दाबून ठेवला-
आमच्या सरकार काळात कोळी बांधवांच्या हितासाठी जस्टीस हरिदास कमिटीची स्थापना केली. कमिटीने अहवाल तयार केला. मात्र त्यानंतर निवडणुका लागल्या. यामध्ये राज्य सरकार बदलले. राज्य सरकारकडे हरिदास कमिटीने तयार केलेला अहवाल दिला. तरी या अहवालाबाबत राज्य सरकारने अद्याप काहीच केले नाही. हा अहवाल दाबून ठेवला असल्याचा आरोप फडणवीस यांनी यावेळी केला आहे.
राज्यातील सर्व निवडणूका स्वबळावर लढविणार -
मुंबई महानगरपालिकेत मनसे बरोबर आघाडी करणार का? या प्रश्नावर देवेंद्र फडणवीस यांनी नाही असे दिले. तर राज्यात होणाऱ्या निवडणुका भाजपा स्वबळावर लढविणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहे.
हेही वाचा- 'शेतकरी पुन्हा भ्रष्टाचारी व्यवस्थेत भरडला जाईल, सरकारने माघार घेऊ नये'
हेही वाचा- संविधानामुळेच २१व्या शतकात भारत करत आहे प्रगती - देवेंद्र फडणवीस