रायगड - खासदार सुनिल तटकरे यांनी प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमात श्रीवर्धन आणि म्हसळा तालुक्यांचा समावेश करून घेण्याची मागणी लावून धरली होती. त्याबाबतचे पत्र व्यवहारदेखील राज्य सरकारकडे तटकरे यांनी केला होता. या संदर्भात त्यांनी आज अल्पसंख्याक विभागाचे केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांची दिल्ली येथे भेट घेतली व निवेदन दिले.
हेही वाचा - अलिबाग मुरुड विधानसभा आढावा : युतीचे पारडे जड; शेकाप गड राखणार का?
अल्पसंख्याक समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी केंद्र सरकारमार्फत प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रम हाती घेण्यात आला आहे. मात्र, या कार्यक्रमातून रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन व म्हसळा हे 2 अल्पसंख्याक बहुल तालुके वगळण्यात आले होते.
हेही वाचा - रेल्वे रुळाला तडे गेल्याने कोकण रेल्वेमार्गावरील वाहतूक दीड तास ठप्प
श्रीवर्धनमध्ये 26.06 व म्हसळामध्ये 30.09 टक्के अल्पसंख्याक वसती आहे. त्यामुळे त्यांच्या विकासासाठी प्रयत्न होणे आवश्यक आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले. त्यामुळे तालुक्याच्या एकंदरीत विकासालाही गती प्राप्त होईल. त्यासाठी या 2 तालुक्यांचा प्रधानमंत्री जन विकास कार्यक्रमांतर्गत अल्पसंख्याक केंद्रित तालुका म्हणुन समावेश व्हावा, अशी आग्रही मागणी तटकरेंनी केंद्रीय मंत्र्यांकडे केली.
हेही वाचा - सरकारला जनतेच्या त्रासाची जाणीव आहे - आदित्य ठाकरे
केंद्रीय मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी याबाबत अनुकूलता दर्शवत, लवकरात लवकर हा निर्णय घेण्यात येईल, याची ग्वाही देत संबंधितांना तसे निर्देश देखील दिले आहेत. त्यामुळे श्रीवर्धन व म्हसळा या दोन्ही तालुक्यांना अल्पसंख्याक तालुक्याचा दर्जा मिळणार असून तेथील विकासाला मोठ्या प्रमाणात चालना मिळणार आहे.