खालापूर(रायगड) - पंचायत समिती कार्यालयाचं गेल्या काही महिन्यापासून काम सुरू आहे. यामुळे याठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाला मोठ्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. या कामाचा त्रास खुद्द पंचायत समितीच्या सभापतींना सहन करावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. या कामामुळे सभापतींना बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन नसल्याने सभापती यांना उपसभापती यांच्या कॅबिनचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे हे इमारतीचं काम केव्हा पूर्ण होईल आणि सभापतींना स्वतंत्र हक्काची कॅबिन बसण्यासाठी केव्हा मिळणार हे पाहणे औत्सुक्याचे आहे.
याबाबत खुद्द सभापतींनी अनेकदा अधिकाऱ्यांना काम लवकरात लवकर करून घेण्याची ताकीत दिली होती. सभापतींच्या सुचनेकडे अधिकारी वर्ग दुर्लक्ष करीत असल्याचे पाहायला मिळत आहे. त्यामुळे सभापतींची कॅबिन दुरावस्थेत सापडली आहे.
सभापतींच्या कॅबिनची दुरावस्था -
खालापूर तालुक्याचं प्रथम नागरिक म्हणून खालापूर पंचायत समितीच्या सभापतीकडे पाहिले जाते. विद्यमान सभापती म्हणून वृषाली ज्ञानेश्वर पाटील या काम पाहात आहेत. शांत - संयमी सभापती म्हणून वृषाली पाटील यांची ओळख असून गेल्या काही महिन्यापासून सभापतींना बसण्यासाठी स्वतंत्र कॅबिन नसल्याने सभापती वृषाली पाटील यांना उपसभापतींच्या कॅबिनचा आसरा घ्यावा लागत असल्याचे पाहावयास मिळत आहे. गेल्या काही महिन्यापासून पंचायत समिती कार्यालयाचे दुरुस्ती काम सुरू आहे. हे काम सुरू असताना सभापतींच्या कॅबिनची दयनीय अवस्था झाल्याचे पाहायला मिळत आहे.
सभापतींची समस्या कधी मार्गी लागणार?
याबाबत सभापती वृषाली पाटील यांनी लवकरात लवकर काम पूर्ण करावे असे सांगूनही अद्याप काम पूर्ण न आल्याने सभापती यांनी नाराजी व्यक्त केली आहे. तर सभापतीच्या कॅबिनची दुरुस्ती काम कधी पूर्ण होणार हे पाहणेसुद्धा महत्वाचे आहे, जर दस्तुरखुद्द सभापतींचे प्रश्न लवकर सुटत नसतील तर सामान्य नागरिकांचे प्रश्न कधी सुटणार? असा प्रश्न विचारला जात आहे.