खालापूर (रायगड) - कर्जत तालुक्यातील प्रतिक जुईकर यांनी रायगडकरांची मान उंचावली आहे. नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (युपीएससी) निकालात प्रतिक जुईकर यांनी देशात 177 वा क्रमांक मिळवला आहे. याचबरोबर त्यांनी रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस होण्याचा मानही मिळवला आहे.
मराठी माध्यमातून घेतले शिक्षण
रायगड जिल्ह्यातील पहिले आयएएस अधिकारी बनलेले प्रतिक चंद्रशेखर जुईकर हे मूळचे अलिबाग तालुक्यातील शहाबाज चौकीचा पाडा येथील राहिवासी आहेत. प्रतिक यांचे वडील हे कोल्हारे येथील जिल्हा परिषद शाळेत शिक्षक आहेत. एका शिक्षकाच्या मुलाने मिळवलेल्या या यशाचे सर्वत्र कौतूक होत आहे.
प्रतिक हे पहिल्यापासून अभ्यासात अत्यंत हुशार आणि तल्लख बुद्धीचे असल्याचे त्यांच्या परिचितांनी सांगितले आहे. त्यांना वाचनाची मोठी आवड आहे. त्यांचे दहावीपर्यंतचे शिक्षण हे कर्जत शहरातील अभिनव ज्ञान मंदिर शाळेत झाले. दहावी परीक्षेत कर्जत तालुक्यातून त्यांनी पहिला क्रमांक पटकावला होता. पुढे त्यांनी मध्यप्रदेशातील भोपाळ येथे आयआयटीमध्ये प्रवेश मिळवला आणि ते बी.टेक झाले. त्यानंतर नोकरी करत असताना, तेथील मित्र हे आयआयटी करुन युपीएससीची तयारी करत होते. त्यांच्यापासून प्रेरणा घेत, प्रतिक जुईकर यांनीही युपीएससी परीक्षेची तयारी सुरु केली. प्रतिक यांच्या आई-वडिलांचीही ते आयएएस अधिकारी व्हावे ही इच्छा होती. अथक परिश्रम करीत, प्रतिक जुईकर यांनी त्यांच्या आई-वडिलांचे स्वप्न पुर्ण केल्याने त्याच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
हेही वाचा : UPSC Success Story : वाशिमच्या अनुजाने युपीएससीमध्ये मिळवली देशात 511 वी रँक