रायगड - सोन्याची तस्करीकरणाऱ्या ७५ वर्षीय वृद्धाला खालापूर पोलिसांनी सापळा रचून खासगी बसमधून ताब्यात घेतले आहे. त्याच्याकडून १ किलो ४७१ ग्रँम वजनाचे सुमारे ४४ लाख रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. गोवा-मुंबई व्हाया कोल्हापूरला सोने नेण्यात येत होते.
खासगी बसमधून सोन्याची तस्करी होत असून सदरची बस मुंबईहून कोल्हापूरला जाणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार शुक्रवारी रात्रीपासून उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. रणजित पाटील यांचा मार्गदर्शनाखाली पोलिसांचे पथक मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावरील खालापूर टोल नाका येथे दबा धरून बसले होते.
महामार्गावरून येणाऱ्या प्रत्येक खासगी बसची कसून तपासणी सुरू होती. शनिवारी पहाटे कोल्हापूरला जाणाऱ्या एका खासगी बसची तपासणी करताना एका वृद्धाची हालचाल संशयास्पद वाटल्याने पोलिसांनी त्याच्या सामानाची कसून झडती घेतली. त्यावेळी कपड्यात सोन्याचे दागिने लपविल्याचे आढळून आले. चौकशी करता खालापूर पोलिसांनी वद्धाला ताब्यात घेतले आहे. याबाबत पोलीस निरीक्षक विश्वजित काइगडे यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.