रत्नागिरी - शिवसेना-भाजप युतीचा सत्तेसाठी नंगानाच सुरू असल्याची टीका आमदार नितेश राणेंनी गुरुवारी रत्नागिरीत केली आहे. यावेळी बोलताना त्यांनी युतीसह खासदार विनायक राऊत यांच्यावरही जोरदार निशाणा साधला.
शिवसेना-भाजप युती झाली असली तरी दोन्ही पक्षांच्या काही नेत्यांमध्ये आरोप-प्रत्यारोप सुरू झाले आहेत. मुख्यमंत्री पदावरूनच जोरदार घमासान सुरू आहे. यावरून आमदार नितेश राणे यांनी युतीवर टीकास्त्र सोडले आहे. युती होताच मुख्यमंत्री कोणाचा यावर सेना-भाजपचे नेते एकमेकांचे कपडे फाडत असतील तर नेमके यांना महाराष्ट्राच्या जनतेचे काही पडलं आहे का? हा सर्वात मोठा प्रश्न असल्याची टीका नितेश राणे यांनी केली आहे. यांनी सत्तेसाठी नंगानाच सुरू केला असून जनता या २०१९ च्या निवडणुकीत योग्य ते उत्तर देईल, असा घणाघात नितेश राणे यांनी यावेळी केला.
यावेळी त्यांनी खासदार विनायक राऊत यांच्यावरही जोरदार टीका केली. मोदी लाटेशिवाय विनायक राऊत निवडून आले नसते, ही वस्तुस्थिती आहे. पण राऊत यांनी त्यांच्या मित्रपक्षालाच न्याय दिला नसल्याची टीका नितेश राणे यांनी केली.
भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी, नेत्यांनी जर राऊतांच्या विरोधाची भूमिका घेतली असेल तर ती स्वागतार्ह आहे, त्यांचे मी अभिनंदन करतो. भाजपमध्ये स्वाभिमान राखणारे लोक आहेत, त्यामुळे स्वाभिमानच्या उमेदवाराला मदत करायला हरकत नाही, असाही टोला त्यांनी यावेळी लगावला.