पुणे - एटीएम कार्डचे क्लोनिंग करून लाखो रुपयांची चोरी करणाऱ्या नायजेरियन टोळीला कोंढवा पोलिसांनी अटक केली आहे. इरमेहन स्टीवेन आणि उम्मु अयान मेहबूब जुमा (दोघे रा. नायजेरिया) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
यासंदर्भात मूळ ओरिसा येथील असलेल्या आणि सध्या पुण्यात राहणाऱ्या एका नागरिकाने अतिरिक्त पोलीस आयुक्त सुनील फुलारी यांच्याशी संपर्क केला होता. त्यानंतर कोंढवा पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची तपासणी करून दोन्ही संशयितांना ताब्यात घेतले होते.
चौकशी दरम्यान त्यांच्याकडे क्लोनिंगसाठी वापरण्यात आलेले साहित्य मिळून आले होते. त्यांनी दोन एटीएम सेंटरमध्ये स्पाय कॅमेरा आणि स्कीमर लावल्याचेही पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. त्याप्रमाणेच पुण्यातील सुमारे ५० नागरिकांचे एटीएम कार्ड क्लोन केल्याची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे.