पुणे - शहरामध्ये सुरू असलेल्या हेल्मेट सक्तीच्या कारवाईला आता चाप बसणार आहे. पुण्यातील पाच आमदारांनी आज मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पुणेकरांच्या भावना त्यांच्याकडे व्यक्त केल्या. पुण्यातील हेल्मेट सक्तीला ब्रेक मिळाल्यामुळे हेल्मेट सक्ती विरोधी कृती समितीच्या सदस्यांनी मिठाई वाटून आनंद साजरा केला.
पोलिसांकडून दंडेलशाही सुरू असल्याचे सांगत ही सक्तीची हेल्मेट कारवाई थांबवावी, अशी विनंती मुख्यमंत्र्यांकडे या आमदारांनी केली. मुख्यमंत्र्यांनी पुण्यातल्या पोलीस आयुक्तांना फोन वरून ही कारवाई थांबवण्याचे आदेश दिले असल्याची माहिती आमदारांनी दिली आहे. मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर आता पुण्यात सक्तीची हेल्मेट कारवाई थांबणार आहे.
मुख्यमंत्र्यांच्या या भेटीत आ.माधुरी मिसाळ, आ. भिमराव तापकीर, आ. योगेश टिळेकर, आ.विजय काळे आणि आ.योगेश मुळीक या आमदारांचा समावेश होता. या हेल्मेट सक्ती विरोधात गेल्या कित्येक महिन्यांपासून पुण्यात हेल्मेट सक्ती विरोधी कृती समिती संघर्ष करत होती.