पुणे - महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून घेण्यात आलेल्या राज्यसेवा परीक्षा आणि सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक परीक्षा उत्तीर्ण होऊन जवळपास दोन वर्षांचा कालावधी लोटला आहे. तरी अद्यापही नियुक्ती देण्यात आलेली नाही. त्वरित नियुक्त करून घेण्याच्या मागणीसाठी भावी अधिकाऱ्यांनी भीक मांगो आंदोलन आणि बेमुदत उपोषण सुरु केले आहे. पुण्यातील विधानभवन समोर हे आंदोलन सुरु आहे.
पुणे स्टेशनजवळील गांधी पुतळ्याला अभिवादन करून जवळपास ६००-७०० तरुण विधानभवन इथे जमा झाले होते. उत्तीर्णांमध्ये सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाचे ८३२, तर राज्यसेवेच्या ३७७ पदांचा समावेश आहे. राज्यसेवेच्या निकालाला १६ महिने, तर सहाय्यक मोटार वाहन निरीक्षक पदाच्या निवडीला ३२ महिने उलटून गेले आहेत. तरीही हे उमेदवार नियुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत.
समांतर आरक्षणाच्या खटल्यामुळे ही नियुक्ती रखडली आहे. मात्र, यातील ९५ टक्के उमेदवारांचा याच्याशी संबंध नाही. न्यायालयीन लढाईमध्ये या अधिकाऱ्यांच्या बाजूने निकाल लागला आहे. मात्र, प्रशासनाच्या उदासीनतेमुळे आणि सामान्य प्रशासन विभाग व महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या टोलवाटोलवीमुळे निवड होऊनही हे अधिकारी आज हलाखीचे जीवन जगत आहेत.