बारामती (पुणे) - अष्टविनायक तीर्थक्षेत्र मोरगाव (ता. बारामती) येथील माघी यात्रा उत्सवाच्या निमित्ताने माघ शुद्ध प्रतिपदा शुक्रवार (ता. १२) ते माघ शुद्ध पंचमी मंगळवार (ता. १६) पर्यंत विविध धार्मिक कार्यक्रम होणार आहेत. यात्रेदरम्यान सर्व धर्मीयांना मुक्तद्वार दर्शनाच्या निमित्ताने मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन श्रींस जलस्नान घालण्याची परवानगी असते. मात्र, कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे ही परवानगी प्रशासनाने नाकारली आहे. उत्सवकाळात मंदिर सुरू राहणार असून भाविकांना केवळ नित्य दर्शन घेता येणार असल्याची माहिती चिंचवड देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त विनोद पवार यांनी दिली.
मयुरेश्वर माघी यात्रा उत्सव मुक्तद्वार दर्शन
दरवर्षी माघ शुद्ध प्रतिपदा ते शुद्ध पंचमी या काळात पहाटे पाच ते दुपारी बारा वाजेपर्यंत मुख्य मूर्ती गाभार्यापर्यंत जाऊन श्रींना जलस्नान व अभिषेक पूजा घालण्याची पर्वणी साधता येते. वर्षातून हा दोनदा योग असतो. त्यापैकी एक भाद्रपद यात्रा व दुसरी माघ यात्रा उत्सव होय. काही दिवसावर येऊन ठेपलेल्या माघी यात्रा उत्सवास परवानगी मिळणेबाबत चिंचवड देवस्थान ट्रस्टच्यावतीने पत्रव्यवहार केला होता. त्याचबरोबर मोरगावचे सरपंच निलेश केदारी यांनी भावीकांना मुक्तद्वार दर्शनास परवानगी मिळणेबाबत प्रांताधीकारी व विविध शासकीय पातळीवर प्रयत्न केले होते. यानुसार वडगांव निंबाळकर पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सोमनाथ लांडे यांनी दिलेल्या पत्रानुसार कोरोना या विषाणूजन्य आजारामुळे फक्त मुख्य मूर्ती गाभाऱ्यात जाऊन जलस्नानास (मुक्तद्वार दर्शनास) परवानगी नाकारली आहे.मात्र नेहमीप्रमाणे मंदिर सुरु ठेवण्यास परवानगी मिळाली आहे.सर्व भावीकांसाठी मुख्य मूर्ती गाभाऱ्याच्या बाहेरुन नित्य दर्शनास, तसेच परंपरेने चालत आलेल्या धार्मिक कार्यक्रमास परवानगी दिलेली आहे.
यात्रा काळात भक्तांना नित्य दर्शन घेता येणार
दरम्यान, श्रीमान महासाधू मोरया गोसावी प्राप्त मंगलमूर्ती पालखी सोहळा मागील भाद्रपद यात्रेप्रमाणे याही यात्रेस गाडीतून येणार आहे. हा पालखी सोहळा रविवार दि.१४ रोजी रात्री ८ वाजता येणार आहे. यावेळी मंगलमूर्ती व मयुरेश्वर भेट सोहळा संपन्न होतो. यात्रे दरम्यान श्रींना भडजडीत सुवर्णालंकारयुक्त पोशाख चढविण्यात येतो. यात्रा काळात मुख्य विश्वस्त मंदार देव यांच्या हस्ते महापूजा व इतर धार्मिक कार्यक्रम संपन्न होणार आहेत. तर मंगलमूर्ती पालखीचे मोरगाव येथून प्रस्थान बुधवार दि.१७ रोजी दुपारनंतर होणार आहे.