पुणे - कोरोनामुळे गेल्या पाच महिन्यांपासून मंदिरे बंद आहेत. याचाच फायदा घेत शिरुर शहराच्या मध्यवर्ती भागात असणाऱ्या रेणुकामाता मंदिराच्या कळसावर स्थानिक तरुणानेच डल्ला मारला. शिरुर पोलिसांनी चोरी गेलेल्या कळसासह दोन तासात आरोपीला जेरबंद केले. प्रशांत आबा म्हस्के असे कळस चोरी प्रकरणी अटक करण्यात आलेल्या तरुणाचे नाव आहे.
गुरुवारी(६ऑगस्ट) रात्री शिरुर शहरातील टेकडीवर असलेल्या रेणुकामाता मंदिराचा कळस चोरी झाला. मंदीर बंद असताना मंदिराच्या कळसाची चोरी झाल्याने सर्वजण संताप व्यक्त करत होते. या घटनेचे गांभीर्य लक्षात घेत शिरुर पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला. यावेळी काही स्थानिकांनी परिसरातीलच एका तरुणाला मंदिराकडे जाताना पाहिल्याचे सांगितले. मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी प्रशांत नावाच्या तरुणाचा शोध घेऊन त्याला ताब्यात घेतले.
सुरुवातीला त्याने पोलिसांना उडवाउडवीची उत्तरे दिली मात्र, पोलिसांनी कसून चौकशी केली असता त्याने गुन्हा कबुल केला. पोलिसांनी आरोपीकडील ५ किलो वजनाचा पंचधातूचा २० हजार रुपये किंमतीचा कळस जप्त केला.