पुणे - जिल्ह्यातील आंबेगाव तालुक्यात नांदूर येथील शेतकऱ्याने 'जिरेनिअम' या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड करून शेतीत एक वेगळा प्रयोग केला आहे. सध्या हे पीक काढणीला आले असून त्यांचा हा प्रयोग चांगलाच यशस्वी झाला आहे. या निमित्ताने ईटिव्हीने घेतलेला या प्रयोगाचा आढावा.
आंबेगाव तालुक्यातील नांदूर गावातील प्रगतशील शेतकरी असलेले रवींद्र मारुती विश्वासराव यांनी आपल्या दीड एकर क्षेत्रावर "जिरेनिअम" या सुगंधी औषधी वनस्पतीची लागवड केली आहे. या वनस्पतीपासून तयार होणाऱ्या तेलाचा वापर सौंदर्य प्रसाधनात औषधे बनवण्यासाठी प्रामुख्याने केला जातो. जिल्ह्यात प्रथमच अशा प्रकारचा प्रयोग विश्वासराव यांनी केला आहे. पीक काढणीला आले असून शेतकरी आणि अभ्यासक हे पीक पाहण्यासाठी भेट देत आहेत. विश्वासराव यांनी या पिकाबाबत सर्वत्र माहिती घेतल्यानंतर त्यातील मार्केटिंगचाही अभ्यास केला आहे.
पारंपरिक पिकांना मागील काही वर्षात योग्य बाजारभाव मिळत नाही. म्हणून विश्वासराव यांच्या कृषी पदवीधर असलेल्या थोरल्या मुलाने जिरेनिअम पिकाची माहिती घेतली आणि या पिकाच्या लागवडीचा आग्रह धरला. मार्केटला या पिकाला मिळणारा हमी भाव आणि वर्षभर असलेली मागणी लक्षात घेता पीक लागवडीचा निर्णय घेण्यात आला. यासाठी पन्नास दिवसांची पूर्ण वाढलेली १३ हजार ५०० रोपे दहा रुपये प्रति नग याप्रमाणे खरेदी केली. १३ नोव्हेंबर २०१८ ला या रोपांची लागवडही केली. पीक आता काढणी अवस्थेत आहे
या सर्व कामात विश्वासराव यांची पत्नी प्रेरणा यांचाही खारीचा वाटा असतो. पहिल्याच वर्षी या पिकाच्या रोपांना मोठी मागणी आल्याने या सर्व पिकातून रोपे तयार करण्याची त्यांची लगबग सुरू आहे. परिसरात करार शेतीचा अवलंब करून स्वतः प्रोसेसिंग युनिट टाकण्याची त्यांनी केली आहे.
एकदा लागवड केल्यावर या पिकातून किमान ३ वर्ष उत्पन्न मिळते. एका वर्षात किमान तीन वेळा कापणी केली जाते. पिकापासून औषधनिर्मिती आणि पालापाचोळ्यातून खत निर्मिती केली जाते. एकरमधून वर्षाला ४ ते ५ लाखांचा नफा मिळण्याची हमी असल्याने विश्वासराव कुटुंबीय या पिकातून मिळणाऱ्या नफ्यासाठी उत्सुक आहेत. परिसरातील शेतकऱ्यांना ते या पिकाच्या लागवडीसाठी आग्रही आहेत.
शेती करताना नवनवीन तंत्रज्ञानातुन शेतीचे यशस्वी प्रयोग राबविले जातात. या प्रयोगांचे आवलोकण प्रत्येकाने करण्याची काळाची गरज बनत चालली आहे, हेच या निमित्ताने सांगावे लागेल.