पुणे - देशामध्ये कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संशयित व्यक्तीविरुद्ध यापुढे त्वरित लूक आऊट सर्क्युलर काढण्याचे आदेश केंद्रीय गृहमंत्रालयाने राज्याच्या पोलीस महासंचालकांना दिले आहेत.
गेल्या काही वर्षांमध्ये नीरव मोदीसारख्या उद्योगपतींनी बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांचा गैरव्यवहार केला आहे. त्यानंतर त्यांनी देशातून पलायन केल्यामुळे त्यांच्याकडून गैरव्यवहारातील रक्कम वसूल करणे कठीण झाले आहे. त्यामुळे केंद्रीय गृहमंत्रालयाने बँक घोटाळे करणाऱ्या अशा व्यक्तींचे पलायन रोखण्यासाठी त्यांच्याविरूद्ध त्वरित लूक आऊट सर्क्युलर काढण्याचे आदेश राज्याचे पोलीस महासंचालक आणि देशातील अन्य तपास यंत्रणांना दिले आहेत.
'ईटीव्ही भारत' ला मिळालेल्या माहितीनुसार, केंद्र सरकारने गेल्यावर्षी बँकेमध्ये गैरव्यवहार करणाऱ्या संशयितांविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर काढण्यासाठी विनंती करता येणाऱ्या अधिकाऱ्यांच्या यादीमध्ये राष्ट्रीयकृत बँकांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांचा समावेश केला होता. मात्र, अनेकदा लूक आऊट सर्क्युलर काढण्यासाठी विलंब होण्याची शक्यता असते. त्यामुळे देशातील सगळ्या तपास यंत्रणांना बँक गैरव्यवहार प्रकरणी गुन्हा नोंद झाल्यास संशयितांविरुद्ध त्वरित लूक आऊट सर्क्युलर काढण्याची प्रक्रिया सुरू करण्याचे आदेश केंद्रीय गृह मंत्रालयाने दिले आहेत.
दरम्यान, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या आदेशानुसार राज्याचे पोलीस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्तांनादेखील बँक गैरव्यवहार प्रकरणातील संशयितांविरुद्ध लूक आऊट सर्क्युलर काढण्यासंदर्भात आदेश दिले आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.