पुणे - पिंपरी-चिंचवड शहरातील गायत्री नंदकुमार देवकर या विद्यार्थिनीने दहावीच्या परीक्षेत 94 टक्के गुण मिळवून घवघवीत यश संपादन केले आहे. तिला भविष्यात वैद्यकीय शिक्षण घेऊन डॉक्टर व्हायचं असून, गरीब रुग्णांची सेवा करायची असल्याचे तिने सांगितले. गायत्री चिंचवडमधील एका खासगी शाळेत शिक्षण घेत आहे. तिच्या या यशामुळे आई खुश असून, भावाचं स्वप्न पूर्ण करायचं असल्याने डॉक्टर होण्याच्या दिशेने वाटचाल करत असल्याचे गायत्रीने सांगितले.
आज (बुधुवार) दहावीचा निकाल जाहीर झाला. नेहमीप्रमाणे यंदाही मुलींनीच बाजी मारली आहे. मुलींचा निकाल ९६.९१ टक्के लागला तर मुलांचा निकाल ९३.९० टक्के लागला आहे. मुलींचा निकाल मुलांच्या तुलनेत ३.१ टक्क्यांनी अधिक आहे. दरम्यान, भोसरी परिसरात राहणाऱ्या गायत्रीने दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश संपादन केले आहे. तिचे सर्वत्र कौतुक होत असून, कुटुंबातील सदस्य आनंदीत आहेत. गायत्री मिळेल त्या वेळेत आईला घरकाम करू लागायची. पहाटे उठल्यानंतर अभ्यास, दिवसभर शाळा झाली की, सायंकाळी शिकवणी आणि त्यानंतर पुन्हा अभ्यास ती करायची. आपल्याला डॉक्टर व्हायचं आहे हे तिने निश्चित केले असल्याने ती स्वस्त बसत नव्हती. दिवसभरात मिळेल त्या वेळेत चार तास अभ्यास कतर असल्याचे तिने सांगितले.
