पिंपरी-चिंचवड (पुणे)- मोशी परिसरात एका सोसायटीतील इमारतीच्या अकराव्या मजल्यावरून तरुण अभियंत्याने उडी मारत आत्महत्या केली आहे. अक्षय अनिल पोतदार (वय 24 रा, रा. चिखली, मूळ रा. वाई, जि. सातारा), असे आत्महत्या करणाऱ्या अभियंता (इंजिनिअर) तरुणाचे नाव आहे. दरम्यान, ज्या सोसायटीत तरुणाने आत्महत्या केली आहे, तिथे तो राहात नसल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्षय अनिल पोतदार हा तरुण पिंपरी-चिंचवडमधील चिखली परिसरात मित्रांसोबत राहात होता. तसेच एका खासगी कंपनीत तो काम करायचा. बुधवारी (दि. 8 जुलै) दुपारी तीनच्या सुमारास तो मोशी येथील वूड्स व्हीला फेज तीन सोसायटीमध्ये गेला होता. अ इमारतीच्या 802 फ्लॅटमध्ये जायचे असल्याचे सांगून त्याने इमारतीत प्रवेश केला. दरम्यान, अकराव्या मजल्यावर जाताच त्याने इमारतीतून खाली उडी मारून आत्महत्या केली.
अक्षयने आत्महत्या का केली, हे समजू शकले नाही. अक्षय हा अविवाहित असून तो चिखली परिसरात मित्रांसह राहात होता. आत्महत्या करण्यापूर्वी त्याने आई, बाबा आणि बहिणीला सांभाळा, मी हे जग सोडून जात आहे, असे व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवले होते, अशी माहिती त्याच्या मित्रांनी पोलिसांना दिली आहे. घटनेचा अधिक तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.