पुणे - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीतील पदवीधर गटाच्या दहा जागांसाठी आज मतदान होत आहे. (Savitribai Phule Pune University election). पुणे, अहमदनगर, नाशिक आणि सिल्वासा येथील एकूण ७१ मतदान केंद्रावर मतदान होत असून, निवडणूक प्रशासनातील २०० हून अधिक प्राध्यापक, अधिकारी, कर्मचाऱ्यांकडून निवडणुकीवर देखरेख करण्यात येत आहे. यंदा विद्यापीठ निवडणुकीला पहिल्यांदाच राजकीय स्वरूप आल्याने या निवडणुकीला महत्त्व प्राप्त झाले आहे. (SPPU Senate Election).
भाजप विरुद्ध महाविकास आघाडी लढत - सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या या निवडणुकीत महाविकास आघाडी सरकार विरुद्ध भाजप अशी लढत पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षाशी संबंधितांचा विद्यापीठ विकास मंच, राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या महाविकास आघाडीचे सावित्रीबाई फुले परिवर्तन पॅनेल, काँग्रेसने पाठिंबा दिलेले छत्रपती शाहू महाराज परिवर्तन पॅनेल, हिंदू महासभा यांनी आपापले उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवले आहेत. निवडणुकीसाठी विविध महाविद्यालयात मोठ्या प्रमाणावर मतदान होत असून यात भाजप आणि महाविकास आघाडी सरकार कडून आम्हीच जिंकणार अस विश्वास दोन्ही पक्षांकडून व्यक्त करण्यात येत आहे.
एकूण ११४ बूथ आहेत - महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ अधिनियम २०१६ मधील तरतुदींनुसार सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभेवर पदवीधर गटातून दहा उमेदवार निवडून देण्यासाठी ही निवडणूक होत आहे. अधिसभेवर पुढील पाच वर्षासाठी या प्रतिनिधींची निवड केली जाणार आहे. एक हजार मतदारांमध्ये एक बूथ प्रतिनिधी असे ११४ बूथ आहे. पाच हजार मतदारांमध्ये एक केंद्र निरीक्षक आहे. प्रत्येक बूथवर एक प्रतिनिधी असेल अशी ७१ मतदान केंद्र असून. त्यात पुणे शहर येथे २६, पुणे ग्रामीण येथे १०, अहमदनगर १५, नाशिक १९, तर सिल्वासा येथे एक मतदान केंद्र आहे.