बारामती- बारामती शहरात ठिकठिकाणी रस्त्यांची दुरावस्था झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. बारामती शहरात प्रशस्त रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात आले आहे. या रस्त्यामुळे बारामतीच्या वैभवात भर पडली आहे. मात्र मागील काही महिन्यांपासून बारामती नगरपालिका व जिल्हा परिषदेच्या अखत्यारीतील रस्त्यांकडे दुर्लक्ष झाले. शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची चाळण झाल्याचे चित्र आहे.
शहरातील तीन हत्ती चौक ते परकाळे बंगला, देवकाते हॉस्पिटल ते प्रशासकीय भवन बाह्यवळण रस्ता, तसेच कसबा येथील साठे चौक ते ढवाण पाटील चौक यासह शहरातील ठिकठिकाणच्या रस्त्यांची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे. नागरिकांसह प्रसारमाध्यमांनी वेळोवेळी शहरातील रस्ते दुरुस्तीकडे पालिकेचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र अद्याप शहरातील रस्त्यांची अवस्था जैसे थे! असल्याचे दिसून येत आहे. बारामतीत निर्माण करण्यात आलेल्या रस्त्यांमुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. मात्र सध्या या रस्त्यांची दुरवस्था झाल्याने नागरिकांमधून नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरपालिकेचे रस्त्यांकडे दुर्लक्ष
बारामती नगरपालिका ही पुणे जिल्ह्यातील एकमेव अ दर्जाची नगरपालिका आहे. शिवाय नगरपालिकेकडे पुरेसा निधी असतानाही शहरातील रस्त्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे. शहरात ठिकठिकाणी नळ कनेक्शन, गटारी, केबल टाकण्यासाठी रस्त्यावर खोदकाम केले जाते. त्याबदल्यात नगरपालिका नुकसान भरपाई घेते. मात्र सदर ठिकाणी केलेल्या खोदकामाची डागडुजी वेळीच पालिकेकडून केली जात नाही. त्यामुळे आणखी रस्ता खराब होतो. व त्याचा नागरिकांना नाहक त्रास सोसावा लागतो.
हेही वाचा- अपर जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बारामतीतील विकास कामांचा आढावा