पुणे - शहरातील रविवार पेठेतील भांडी आळीमध्ये 90 वर्षे जुना वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. आज सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. सोमवारी संध्याकाळीच हा वाडा खाली करण्यात आला होता. यामध्ये 12 जण थोडक्यात बजावले आहेत.
या वाड्याला पुणे महापालिकेने धोकादायक वाडा ठरवून नोटीस बजावली होती. सोमवारी संध्याकाळीच हा वाडा रिकामा करण्यात आला होता आणि आज सकाळी 9 वाजण्याच्या सुमारास हा दुमजली वाडा कोसळला. सुदैवाने यामध्ये कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र, वाड्याला लागूनच असणारा आणखी एक दुमजली वाडा कुठल्याही क्षणी कोसळू शकतो. त्यामुळे हा वाडाही तत्काळ खाली करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काही दिवसांपूर्वीच पुण्यातील कोंढवा आणि आंबेगाव परिसरात सीमाभिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत 20 नागरिकांचा मृत्यू झाला होता. त्यानंतर धास्तावलेल्या पालिका प्रशासनाने पुणे शहराच्या मध्यवस्तीतील 292 धोकादायक स्थितीतील वाड्यांना नोटिसा बजावल्या होत्या. मात्र, नोटिसा बजावूनही नागरिक वाडे खाली करत नसल्यामुळे पालिका प्रशासनाने पोलिसांना हस्तक्षेप करण्याची विनंती केली आहे.