परभणी- पाथरी येथील बांदरवाडा रस्त्यालगतच्या जवाहरनगर येथे असलेल्या एका मॉलमध्ये शुक्रवारी पहाटे तीन चोरट्यांनी लोखंडी शटर वाकवून चोरी केली. यात मॉलच्या गल्ल्यातील रोख पाच हजार पाचशे रुपयांची रक्कम चोरट्यांनी पळवली. मात्र, कोणी तरी येत असल्याची कुनकून लागताच चोरट्यांनी पोबारा केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये स्पष्ट दिसत आहे.
येथील जवाहरनगर भागात सुबूर अहेमद सिद्धीकी यांचा सुविधा मॉल आहे. बाजुलाच त्यांचे किराणा आणि जनरल स्टोअर्सचे दुकानही आहे. या परिसरात मॉल सीसीटीव्हीच्या कक्षेत आहे. शुक्रवारी पहाटे सव्वातीनच्या सुमारास २० ते २२ वर्ष वयाचे तीन चोरटे या ठिकाणी दाखल झाल्याचे दिसत आहे. यावेळी किराणा दुकानासमोरील विजेचा बल्ब या चोरट्यांनी काढला.
त्यानंतर किराणा दुकानाचे शटर वाकवण्याचा प्रयत्न केला. मात्र, समोर काऊंटर असल्याने त्यांनी बाजुच्या मॉलकडे मोर्चा वळवला. त्यानंतर मध्यभागी असलेले शटर हाताने ताकत लावत ओढून वाकवले आणि हे तीघे मॉलच्या आतमध्ये शिरले. त्यानंतर त्यांनी गल्ल्यातील शंभर, वीस, पन्नासच्या नोटा आणि चिल्लर मिळून साडेपाच हजार रुपये रोख काढून घेतले. या वेळी त्यांना कशाची तरी कुणकूण लागल्याने ते तात्काळ पसार झाले. त्यामुळे इतर किमती माल वाचला.
दरम्यान, सकाळी फिरायला बाहेर पडलेल्या सुबूर सिद्धीकी यांना शटर वाकवल्याचे लक्षात आले. त्यानंतर त्यांनी पाथरी पोलिसात तक्रार दाखल केली. सीसीटीव्ही फुटेजच्या अधारे पाथरी पोलीस चोरट्यांचा शोध घेत आहेत. मात्र, संध्याकाळी उशिरापर्यंत कुठलाही सुगावा पोलिसांना लागला नव्हता.