परभणी - येथील जिल्हा रुग्णालयाच्या ऑक्सिजन प्लांटवरच मध्यरात्री सोसाट्याच्या वाऱ्यामुळे एक झाड कोसळले. त्यामुळे प्लांटमधील ऑक्सिजनची मोठ्याप्रमाणात गळती झाली. ही माहिती मिळताच जिल्हाधिकारी दीपक मुगळीकर यांच्यासह पोलीस अधीक्षक जयंत मीना आणि इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी धाव घेऊन वेळीच तंत्रज्ञांच्या साहाय्याने ही गळती रोखली. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.
मंगळवारी मध्यरात्री घडली घटना -
मंगळवारी मध्यरात्री परभणीत सोसाट्याचा वारा सुटला होता. या वादळामुळे जिल्हा रुग्णालयातील ऑक्सिजन प्लांटवरच एक झाड कोसळले. त्यामुळे ऑक्सिजन प्लांटपासून कोरोना कक्षाकडे ऑक्सिजन वाहतूक करणारे पाईप तुटले. परिणामी त्यातून ऑक्सिजनची गळती होऊ लागली. मात्र, हा प्रकार वेळीच कर्मचाऱ्यांच्या लक्षात आल्याने तत्काळ तंत्रज्ञांना बोलावून हे पाईप जोडण्यात आले. ज्यामुळे ऑक्सिजनची गळती थांबून पुढील अनर्थ टळला.
खासदारांसह जिल्हाधिकारी धावले -
नाशिक येथे ऑक्सिजन गळतीमुळे मोठ्या प्रमाणात जीवितहानी झाली होती. या प्रकारामुळे ऑक्सिजन गळतीकडे सर्व महाराष्ट्रात गांभीर्याने लक्ष देण्यात येत आहे. विशेष म्हणजे परभणीच्या जिल्हा रुग्णालयासह जिल्हा परिषद आणि आयटीआय सेंटर या ठिकाणी बसविण्यात आलेल्या ऑक्सीजन प्लांट वर 24 तास सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, असे असतानाही हा अपघात नैसर्गिकरित्या घडला. या प्रकाराची माहिती मिळताच खासदार संजय जाधव, जिल्हाधिकारी दीपक मूगळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक बाळासाहेब नागरगोजे यांनी तातडीने धाव घेतली.
14 रुग्ण अन्यत्र हलवले -
सदर ऑक्सिजन प्लांटमधून ज्या कक्षात ऑक्सिजनचा पुरवठा होत होता, त्या ठिकाणी 14 रुग्ण उपचार घेत आहेत. ऑक्सिजनची गळती सुरू होताच, या चौदा रुग्णांना अन्यत्र हलविण्याचे प्रयत्न सुरू करण्यात आले. शिवाय पोलिसांना खबर दिल्याने जिल्हा पोलीस अधीक्षक जयंत मीना तसेच निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडजकर, उपविभागीय अधिकारी डॉ. संजय कुडेटकर यांच्यासह अन्य आधिकारी घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाचे बंबही दाखल झाले होते.
या घटनेनंतर प्लांटमधून काही काळ वायू गळती सुरुच होती. विशेष म्हणजे या संदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष संतोष देशमुख यांनी प्रथम जिल्हाधिकारी मुगळीकर आणि जिल्हा शल्यचिकित्सक नागरगोजे यांना कल्पना दिली होती.