पालघर - जिल्ह्यात ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये झालेल्या अवकाळी पावसाची नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई मिळणे अपेक्षित होते. त्यानुसार पालघर जिल्हा प्रशासनाच्या पाठपुराव्यानुसार नुकसान भरपाईचा दुसरा हप्ता पालघर जिल्ह्याला प्राप्त झाला असून नुकसान भरपाईच्या निधी वाटपाचे काम सुरू झाले आहे.
अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील सुमारे 1 लाख 14 हजार शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. या शेतकऱ्यांना आतापर्यंत सुमारे 40 कोटी 13 लाख नुकसान भरपाई मिळणे अपेक्षित आहे. त्यापैकी राज्य शासनाने 18 नोव्हेंबर रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार पालघर जिल्ह्याला नुकसान भरपाईच्या पहिल्या टप्प्यात सुमारे 26 हजार 417 शेतकऱ्यांसाठी 9 कोटी 73 लाख रुपये निधी प्राप्त झाला होता. त्याचे वाटप करण्यात आलेले आहे. त्यानंतर राज्य शासनाने जिल्ह्याला दिलेल्या दुसऱ्या हप्त्यात 38 हजार 88 शेतकऱ्यांना 21 कोटी 26 लाख रुपयांच्या निधीचे वितरण जिल्हा प्रशासनाकडे केले आहे.
हेही वाचा - सावधान.. तुमच्यावर कुणीतरी नजर ठेवतंय; सुरक्षेसाठी ऐनशेतमध्ये गावकऱ्यांनी उचलले हे पाऊल
आतापर्यंत जिल्हा प्रशासनाला पहिला व दुसरा टप्पा असे मिळून एकूण 30 कोटी 11 लाख रुपयांचा नुकसानग्रस्त निधी प्राप्त झाला आहे. पालघर जिल्ह्यातून 1 लाख 14 हजार नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्रति हेक्टरी 6 हजार 800 रुपये ठरवल्यानुसार 34 कोटींची मागणी जिल्हा प्रशासनाने राज्याकडे केली होती.
त्यानंतर राज्य शासनाने ही भरपाई प्रति हेक्टरी 8 हजार भात पिकासाठी तर 18 हजार फळपिकासाठी वाढवून दिल्याने राज्य शासनाने ठरवून दिलेल्या नवीन नुकसान भरपाईच्या नियमानुसार ही भरपाई जिल्ह्यासाठी 40 कोटी 13 लाख इतकी ठरविण्यात आली आहे. यापैकी सुमारे 9 कोटी 73 लाखांचा पहिला तर 21 कोटी 26 लाखाचा दुसरा हप्ता आतापर्यंत जिल्हा प्रशासनाकडे राज्य शासनाकडून वर्ग झालेला आहे. यातील उर्वरित 9 कोटींचा निधी येणे बाकी आहे.
हेही वाचा - मुंबई-अहमदाबाद महामार्गावर लाखोंचा गुटखा जप्त
दुसऱ्या हप्त्यातील 21 कोटी रकमेपैकी काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा झाली आहे. त्यातील काही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यावर वाटप करण्याचे काम सुरू आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनामार्फत देण्यात आली आहे.