पालघर - 'थर्टी फर्स्ट' सर्व समाज बांधवांकडून अतिशय उत्साहाने साजरा केला जातो. या दरम्यान बहुतेक जणांचा मद्य प्राशनाकडे ओढा जास्त असतो. त्यामुळे परराज्यातून होणाऱ्या दारू तस्करीवर पोलीस लक्ष ठेवून आहेत. तसेच पार्टी व मद्य विक्रीचे परवाने असलेल्या ठिकाणीच नागरिकांनी 'थर्टी फर्स्ट' साजरा करण्यासाठी जावे, बेकायदा मद्यविक्री होत असलेल्या ठिकाणी जाणे टाळावे, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभाग, पालघरचे अधीक्षक व्ही.टी. भूकन यांनी केले आहे.
परवाने नसलेल्या व बेकायदेशीर भेसळयुक्त दारू विकणाऱ्या अशा पार्ट्यांवर कारवाई केली जाणार असल्याचेही भूकन यांनी सांगितले.
हेही वाचा - अवकाळी पावसाच्या नुकसानीचा 21 कोटींचा दुसरा हप्ता जिल्हा प्रशासनाकडे वर्ग
महाराष्ट्रात पालघर जिल्ह्याच्या सीमेलगत असलेल्या राज्य दमण, दादरा, नगर हवेली, सिल्वासाच्या तुलनेत मद्याचे दर जास्त आहेत. त्यामुळे या राज्यातून उत्पादन शुल्क बुडीत मद्य, बनावट मद्य, ड्युटी फ्री मद्य, अवैध हातभट्टी, बनावट स्कॉच, यासारख्या मद्यांची तस्करी करण्यात येते. इतर राज्यांतून येणारा अवैध मद्यसाठा पालघरमार्गे मुंबई, ठाणे, नाशिक येथे आणला जातो. त्यामुळे पालघर जिल्ह्यातील सीमेलगत असलेल्या महत्त्वाच्या नाक्यांवर मुख्यतः सिल्वासा आणि दमणवरून येणाऱ्या चोरट्या वाटांवर व 31 डिसेंबर निमित्त आयोजित पार्ट्यांवर उत्पादन शुल्क विभागाची करडी नजर असणार आहे.
हेही वाचा - विरार हत्या प्रकरण : आरोपी 48 तासात जेरबंद, मुख्य सुत्रधाराचा शोध सुरू
उत्पादन शुल्क चुकवून येणारा मद्यसाठा रोखण्यासाठी 5 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यामध्ये 5 निरीक्षक, 8 दुय्यम निरीक्षक, इतर कर्मचारी, वाहनचालक असा एकूण 80 जणांचा समावेश आहे. त्यातील 4 फिरती गस्त घालत असून, तलासरी येथे मुंबई अहमदाबाद महामार्गावर 24 तास पारख ठेवण्यासाठी 1 सीमा तपासणी नाका तयार करण्यात आला आहे.