पालघर - बहुजन विकास आघाडीचे शिट्टी हे चिन्ह बहुजन महापार्टीला मिळाले असून बहुजन विकास आघाडीला मात देण्यासाठी शिवसेनेने केलेली ही खेळी आहे, अशी सर्वत्र चर्चा आहे. मुले पळवणाऱ्यांनी आमचे पारंपरिक निवडणूक चिन्ह शिट्टीही पळविले. आम्ही आमचे पारंपरिक चिन्ह शिट्टीसह रिक्षा, अंगठी या निवडणूक चिन्हांची मागणी केली आहे. पण आम्हाला मिळेल त्या चिन्हावर निवडणूक लढवून आमचा उमेदवार निवडून आणू असा, विश्वास हितेंद्र ठाकूर यांनी व्यक्त केला आहे.
आम्ही गुंड असू तर, पाच वर्ष सत्तेत असून आमच्यावर कारवाई का केली नाही? असा सवालही ठाकूर यांनी यावेळी उपस्थित केला. निवडणुका आल्या की, शिवसेनेकडून हाच मुद्दा उपस्थित केला जातो. आता बाळासाहेबांची शिवसेना राहिली नसल्याचे सांगत, उद्धव ठाकरेंच्या वसई येथे केलेल्या 'गुंडगिरी संपवायला आलोय' या वक्तव्याचे चोख प्रत्युत्तर बहुजन विकास आघाडीचे सर्वेसर्वा हितेंद्र ठाकूर यांनी दिले आहे.
लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा मंगळवारी शेवटचा दिवस होता. बहुजन विकास आघाडी व महाआघाडीचे पालघर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व माजी खासदार बळीराम जाधव यांचा उमेदवारी अर्ज जोरदार शक्ती प्रदर्शन करत दाखल करण्यात आला. मागील अनेक दिवसांपासून पालघर लोकसभेचा बहुजन विकास आघाडीचा उमेदवार कोण याबाबत महाआघाडीकडून कमालीची गुप्तता पाळली गेली. अर्ज दाखल केल्यानंतर पत्रकार परिषद घेत हितेंद्र ठाकूर यांनी आपला उमेदवार जाहीर केला.