पालघर- जिल्ह्यातील ग्रामीण भागातील लोकांकडून गणपती बाप्पांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी साध्या पद्धतीने मखर सजावट करण्यास प्राधान्य दिले जात आहे. पर्यावरणाचा ऱ्हास थांबविण्यासाठी हा अवलंब होत असल्याचे गणेशभक्तांकडून सांगितले जात आहे.
या अगोदर गणेशोत्सवात थर्माकोल मखर मोठ्या प्रमाणात बाजारपेठेत दिसत असत. मात्र आज पर्यावरणाचा ऱ्हासाला थर्माकोलदेखील जबाबदार मानले जात आहे. ग्रामीण भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ असो की घरगुती गणेशोत्सव असो, कुठे साध्या पद्धतीने सजावट करून तर कुठे आकर्षक रोषणाईची सजावट करून गणेशोत्सव साजरा केला जात आहे. गणेशोत्सवाच्या या भक्तीमय वातावरणात लहान थोरांपर्यंत सगळेच भक्तीत लीन होऊन जातात. विशेष म्हणजे, वाडा तालुक्यातील चिंचघर गावचे तेजस्वी आणि अर्णव पाटील यांच्याकडील घरगुती आरास साध्यापद्धतीने करण्यात आली आहे. कमळावर विराजमान झालेली श्रींची मुर्ती मनमोहक दिसत आहे.