पालघर - महाआघाडी पुरस्कृत बहुजन विकास आघाडीचे उमेदवार बळीराम जाधव पालघर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. त्यांची निशाणी 'रिक्षा' आहे. नालासोपारा पश्चिम येथील श्रीराम ऑटो डिलर्सने रिक्षाची पिवळा कपडा, पिवळे बॅनर आणि त्यावर रिक्षा अशाप्रकारे जाहिरात केली आहे.
रिक्षाची जाहिरात करणाऱ्या श्रीराम ऑटो डिलर्सवर निवडणूक आयोगाने कारवाई केली आहे. ऑटो रिक्षाच्या जाहिरातीचे बॅनर, मंडप आणि रिक्षा अधिकाऱ्यांनी हटवले आहे. श्रीराम डिलर्स करत असलेल्या या प्रकारच्या जाहिरातीमुळे आचारसंहितेचा भंग होत आहे. त्यामुळे कारवाई केल्याचे वसई-विरार महापालिकेचे प्रभारी सहाय्यक आयुक्त प्रवीण पाटील यांनी सांगितले.
ऑटो रिक्षाची डिलरशिप माझाकडे आहे. तो माझा व्यवसाय आहे. रिक्षाचे परमिट खुले असल्यामुळे व्यवसायात मोठी स्पर्धा निर्माण झाली आहे. त्यामुळे आम्हाला जाहिरात करावी लागते. निवडणुकीत कोणाला रिक्षा चिन्ह मिळाले असेल, तर त्यात आमचा काय दोष? निवडणूक आयोगाने त्यांना रिक्षा चिन्ह दिले आहे, मी माझ्या व्यवसायासाठी केलेल्या जाहिरातीने जर आचारसंहितेचा भंग होत असेल, तर जिल्ह्यातील सर्वच रिक्षा रस्त्यावर चालत आहे त्याही बंद करणार का? असा प्रश्न श्रीराम ऑटो डिलरचे मालक विवेक पाटील यांनी उपस्थित केला आहे.