पालघर- देशात कोरोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढतच आहे. या विषाणूच्या संसर्गाची जोखीम ध्यानी घेऊनच महाराष्ट्रात लॉकडाऊन जाहीर करण्यात आले आहे. मात्र अनेकांना याचे गांभीर्य अद्याप उमगलेले नाही. पालघरमध्ये हेच चित्र पाहायला मिळत आहे.
राज्यात कोरोना बाधितांची संख्या ८९वर पोहोचली आहे. त्यामुळे राज्य शासनाने कठोर उपाययोजना करण्यास सुरुवात केली आहे. पालघरवासीयांना याचे गांभीर्य अद्याप उमगलेले नाही. कारण सकाळपासूनच रस्त्यांवर नागरिकांची गर्दी पाहायला मिळाली. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाराष्ट्रात कलम 144 लागू करण्यात आल्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल जाहीर केले. तरीही याकडे मात्र पालघरमधील नागरिकांनी दुर्लक्ष केल्याचे चित्र आहे.
कालच्या जनता कर्फ्यूला उत्स्फूर्त प्रतिसाद देणारे पालघरवासीय आज मात्र मोठ्या संखेने रस्त्यांवर आणि बाजारपेठेत फिरताना दिसून आले. अतिशय निकडीचे काम असेल तरच घराबाहेर पडा, असे आवाहन खरे तर, जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे, मात्र नागरिकांना कोरोना विषाणूबाबत गांभीर्य नसल्याचे यावरून स्पष्ट झाले आहे.