नाशिक - केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शुक्रवारी लोकसभेत मोदी सरकारच्या दुसऱ्या कार्यकाळातील पहिले बजेट सादर केले. सीतारामन यांनी विविध क्षेत्रासाठी वेगवेगळ्या तरतुदी जाहीर करतानाच सोने आणि अन्य मौल्यवान धातूंवरील सीमा शुल्कात वाढ करण्यात आल्याची घोषणा केली. त्यामुळे आधीच सोन्याच्या दराने 33 हजाराचा आकडा पार केला असून आता पुन्हा एकदा सोन्याचे दर 36 हजार रुपयांपर्यंत जाऊन पोहोचले आहेत.
भारत हा सर्वाधिक सोने आयात करणाऱ्या देशांपैकी एक आहे. सध्या सोन्यासह अन्य धातूंवरील आयातीवर 10% सीमाशुल्क असून तो सीमाशुल्क वाढून 12.5 टक्के करण्यात आले आहेत. त्यामुळे सोन्याचे भाव आता सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर जाणार आहेत. तर येत्या काही दिवसात सोने चाळीस हजाराचा आकडा पार करेल अशी शक्यता व्यापारी वर्गाकडून वर्तवली जात आहे.
सोन्यावर 13 टक्के टॅक्स लागतो. यात 10 टक्के आयात कर आणि तीन टक्के जीएसटी यांचा समावेश आहे. आता 12.5 आयात शुल्क आणि तीन टक्के जीएसटी असा एकूण 15.5 टक्के टॅक्स सोन्यावर द्यावा लागणार आहे. सर्वसामान्य महिला या सोने खरेदी करतात व त्याच्या अडचणीच्या काळात मोडतात. मात्र सोन्याचे हे वाढते दर पाहता आता पैशाची बचत होणार नसल्याने महिलावर्गात नाराजी आहे.