नाशिक - विंचूर-प्रकाशा राज्य महामार्गावर अपघातांची मालिका सुरूच आहे. बागलाण तालुक्यातील सटाणा ताराबाद रस्त्यावर ढोलबारे या अरूंद घाटात कच्चे तेल घेऊन जाणारा टँकर (एन एल-01क्यु.3543) उलटल्याने हजारो लीटर कच्चे तेल वाहून गेले. या अपघातात चालक गंभीर जखमी झाला आहे. त्याला सटाणा शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
ताराबाद सटाणा महामार्गावर ताराबादकडून वाहने भरधाव वेगाने येतात. मात्र, मध्येच ढोलबारे गावाजवळ अतिरुंद असा घाट आहे, त्यामुळे अनेकदा याठिकाणी चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटून अपघात होत असतात. प्रशासनाकडून दिशादर्शक फलक या ठिकाणी लावण्यात आले आहेत. मात्र, वाहनांचा वेग कमी होत नसल्यामुळे मोठ्या अपघातच्या घटना या ठिकाणी वारंवार घडतात.
अपघाताची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत, गंभीर जखमी असलेल्या चालकाला रुग्णालयात दाखल केले आहे.