नाशिक - जुना आडगाव नाका परिसरातील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिराची दानपेटी चोरी झाल्याची घटना शनिवारी मध्यरात्री घडली होती. पंचवटी पोलिसांनी या घटनेतील चार संशयितांना अटक केली असून या चोरट्यांनी पुरावा नष्ट करण्यासाठी चोरलेली दानपेटी गोदावरी नदी पात्रात फेकून दिली होती. पोलिसांनी ही दानपेटी नदी पात्राबाहेर हस्तगत केली आहे. अवघ्या दोनच दिवसांत पंचवटी पोलिसांनी या घटनेतील चार संशयितांना अटक केली असून दानपेटी हस्तगत केली आहे. चौकशीमध्ये त्यांनी सदर गुन्हा केल्याचे निष्पन्न झाले. त्यांच्याकडून दानपेटीत असलेली एकुण २७ हजार रुपये रोख रक्कम हस्तगत केली आहे.
दानपेटी फेकली थेट गोदा नदीपात्रात
पंचवटी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक भगत व पोलीस निरीक्षक (गुन्हे) अशोक साखरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाचे सत्यवान पवार व सागर कुलकर्णी, राजेश राठोड, कुणाल पचलोरे, घनश्याम महाले, आंबादास केदार, कल्पेश जाधव या पथकाने घटनास्थळी बारकाईने पाहणी केली. सध्या या मंदिराचे बांधकाम सुरू असल्याने येथील सीसीटीव्ही कॅमेरे काढण्यात आले आहेत. त्यामुळे घटनास्थळापासून १ कि.मी. अंतरावरील सीसीटीव्हीमधून मिळालेल्या अस्पष्ट फुटेजवरून आणि गुन्हे शोध पथकाचे राजेश राठोड व कुणाल पचलोरे यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून राज श्रावण बोडके (वय २०) राहुल राजन सहाणे (वय २१) निलेश श्रीपद उफाळे (वय १८) व गणेश सुरेश काळे (वय २२) या चौघा संशयितांना ताब्यात घेतले. पंचवटी पोलिसांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवत या घटनेतील चार संशयितांना अटक केली. संशयित चोरट्यांची चौकशी केली असता त्यांनी दानपेटी फोडून रिकामी दानपेटी रामवाडी पुलावरून गोदावरी नदीपात्रात फेकुन दिली असल्याचे सांगितले आहे. त्यानुसार पोलिसांनी गोदावरी नदी पात्रातून दानपेटी हस्तगत केली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मोतीलाल पाटील हे करत आहेत.