नंदुरबार - नवापूर शहरातील काही कृषी केंद्रातून आदिवासी शेतकऱ्यांना मुदत संपलेले कीटकनाशक विक्री केली जात असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कीटकनाशके विक्रेत्यांना याबाबत विचारणा केली असता, शेतकऱ्यांनी कीटकनाशक घेत असताना मुदत पाहणे गरजेचे आहे. गर्दी जास्त असल्याने आमच्याकडे मुदत संपलेले कीटकनाशक दिले गेले असतील. जे शेतकरी कीटकनाशक परत घेऊन आले त्यांना नवीन औषधे दिली आहेत, असे सांगितले.
जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात शेतकऱ्यांनी खरिपाची पेरणी केली. यानंतर पावसाने 25 दिवस दांडी मारली. यामुळे अनेक शेतकऱ्यांची पीके पाण्याअभावी जळून गेली. शेतकऱ्यासमोर यामुळे दुबार पेरणीचे संकट उभे राहिले. सध्या दोन दिवसांपासून समाधानकारक पाऊस पडत असून शेतकरी दुबार पेरणीसाठी बी बियाणे व रासायनिक खत खरेदी करण्यासाठी दुकानात गर्दी करत आहे. तर दुसरीकडे बाजारात चढ्या भावाने रासायनिक खतांची विक्री होत आहे. या कारणाने शेतकऱ्याला नैसर्गिक व मानवनिर्मित संकटांना तोंड द्यावे लागत असल्याने, बळीराजा हवालदिल झाला आहे.
शेतीची कामे सोडून संपूर्ण दिवस बाजारात खत व बी-बियाणे खरेदीसाठी लांबलचक रांगेत उभे राहावे लागत असल्याने, शेतकरी वर्गामधून संताप व्यक्त होत आहे. त्याचबरोबर मुदत संपलेले कीटकनाशके शेतकऱ्यांना फसवणूक करुन दिले जात आहे. याशिवाय कोरोना पार्श्वभूमीवर कृषी केंद्रावर कुठेही फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले जात नाही. यामुळे कोरोनाची लागण होण्याचा धोकाही वाढला आहे. या संदर्भात तालुका प्रशासनाने योग्य खबरदारी घेणे गरजेचे आहे, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
बागायत शेतकरी पिकावर रोगाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून नवापूर शहरातील कृषी केंद्रातून कीटकनाशक खरेदी करीत आहे. काही कृषी केंद्रात खराब व मुदत संपलेले कीटकनाशक विक्री केली जात असल्याने शेतकरी वर्गाची फसवणूक होत आहे. यासंदर्भात नवापूर तालुका काँग्रेस कमेटी अध्यक्ष जालमसिंग गावित यांनी संबंधित कृषी केंद्रावर कारवाई करण्याची मागणी केली आहे. अन्यथा आंदोलन केले जाईल असा इशारा त्यांनी दिला आहे.
दुबार पेरणी, शासकीय गोदामातील अपुरा खत साठा, मुदत संपलेले कीटकनाशक, जादा भावाने रासायनिक खतांची, बी बियाणेसाठी कृषी केंद्रावर लागलेली लांब रांग शेतकऱ्यांसाठी डोकेदुखी ठरत आहे. यासंदर्भात जिल्हा प्रशासन योग्य उपाययोजना करावी, अशी मागणी शेतकरी वर्गामधून होत आहे.
हेही वाचा - नवापुरात व्यापाऱ्यांसह नागरिकांचा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद
हेही वाचा - युरिया खताची टंचाई दूर न झाल्यास तीव्र आंदोलनाचा भाजपचा इशारा