नंदुरबार - शेतातून १ लाख रुपये किंमतीच्या बैलांची चोरी झाल्यानंतर माणिक पाटील या शेतकऱ्यांने याची तक्रार पोलीस ठाण्यात केली. मात्र, पोलिसांनी याची दखल न घेतल्यामुळे शेतकऱ्यांने आपल्या कुटुंबीयांना तिफनीला जुंपत पेरणीला सुरुवात केली आहे.
नंदुरबार तालुक्यातील आसाणे गावात रनाळे शिवारात पाटील यांची शेती आहे. उन्हाळ्यात गावात पाणी टंचाई असल्यामुळे त्यांनी शेतातच बैलांची व्यवस्था केली होती. मात्र, १० एप्रिल २०१९ रोजी अज्ञात चोरट्यांनी त्यांचे बैल चोरुन नेले. याबाबत त्यांनी नंदुरबार तालुका पोलीस ठाण्यात तक्रार केली. पण पोलीस प्रशासनाने पाटील यांच्या तक्रारीकडे पूर्णता दुर्लक्ष केले, असा आरोप पाटील यांनी केला.
बैल चोरीच्या एका महिन्यानंतर पाटील यांचा सालदार गिरधर कोळी हा संध्याकाळी शेजारील शेतातून वांगी आणि केऱ्या चोरताना आढळून आला. त्यावेळी त्याला चोरीचा जाब विचारला असता त्याने बैल चोरीची कबुली दिली. आसाने गावचे प्रकाश पाटील आणि त्यांचे मेहुणे संजय तुकाराम (रा. वरखेडी, ता- पाचोरा, जि- जळगाव) यांनी संगनमताने सालदाराला दारू पाजून १५ हजार रुपयांचे आमिष दाखवून बैल चोरुन नेल्याचे सांगितले.
शेतकरी माणिक पाटील यांनी सालदार याच्या सांगण्यावरून आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला. मात्र, पोलिसांनी अजून पर्यंत कोणताही तपास सुरू केलेला नाही. पावसाळा सुरू झाल्याने शेती कामांना वेग आला आहे. पण माणिक पाटील यांच्याकडे बैल नसल्यामुळे तसेच चोरीला गेलेला बैलांचा शोध पोलीस घेत नसल्याने हतबल झालेल्या माणिक पाटील यांनी पेरणी करण्यासाठी स्वतःच्या कुटुंबीयांसोबत तिफन ओढत पेरणीला सुरुवात केली आहे.