नांदेड - केवळ पुढे-पुढे करून पदे पदरात पाडून घ्यायची, कामे न करता फुशारकी मारायची, हे आता चालणार नाही. येणाऱ्या लोकसभा निवडणुकीत कोण किती पक्षाचे काम करत आहे हे दिसून येईलच. त्यामुळे आपल्या गावात व बुथवर ज्या कार्यकर्त्याने 'मताधिक्य' घेतले तोच कार्यकर्ता भारतीय जनता पक्षासाठी 'भारी' राहील. या मूल्यमापनावरच त्याचे भविष्यातील पक्षातील स्थानही अवलंबून राहणार आहे. त्यामुळे बूथ प्रमुख व कार्यकर्त्यांनी अंग झटकून कामाला लागावे, असे आवाहन भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील-रातोळीकर यांनी केले आहे.
अर्धापूर तालुक्यातील भाजप तालुका पदाधिकारी, शक्ती केंद्रप्रमुख, विस्तारक यांची बैठक शंभुनाथ अग्रो प्रोड्युसर कंपनीच्या प्रांगणात संपन्न झाली. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आमदार राम पाटील-रातोळीकर, जिल्हा संघटनमंत्री गंगाधर जोशी, जिल्हा सरचिटणीस राजीव गंदीगुडे, लोकसभा विस्तारक रविंद्र पोटगंटीवार, भोकर विधानसभाध्यक्ष प्रविण गायकवाड, नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक निलेश देशमुख बारडकर, तालुकाध्यक्ष सुधाकर कदम पाटील, शहराध्यक्ष योगेश हळदे, भाजयुमोचे सचिन कल्याणकर, राजाभाऊ राजेवार, बालाजी मरकुंदे, बाबुराव लंगडे, माधवराव बारसे, सखाराम क्षीरसागर आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना रातोळीकर म्हणाले, की आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने येणाऱ्या काळात केंद्राच्या व राज्याच्या सरकारने केलेली कामे कार्यकर्त्यांना समजावून सांगणे ही कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्यक्ष लाभ भेटलेल्या व्यक्तींची व कुटुंबाची भेट घ्या. त्यांच्याशी संवाद अभियान ही मोहीम राबवा. या भागाला मुख्यमंत्री असतानाही जेवढा निधी आला नाही. त्याच्या ५ पट निधी या शासनाच्या काळात जिल्ह्याला मिळाला आहे. आगामी काळातही अनेक महत्वाचे निर्णय होतील. दरम्यान, यावेळी बैठकीत विविध कामांची जबाबदारी वाटून देण्यात आली.
यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन माजी जिल्हा परिषद सदस्य रामराम भालेराव यांनी तर प्रास्ताविक सुधाकर कदम पाटील यांनी केले. आभार निलेश देशमुख यांनी मानले. यावेळी गजानन मुसळे, अशोक स्वामी, प्रल्हाद माटे, जगन देशमुख, बालाजी स्वामी, देविदास कल्याणकर, विलास साबळे, बाबाराव मुसळे, आत्माराम राजेगोरे, उद्धव कदम, संतोष मुंगल, सय्यद युनूस, आनंदराव सोळंके, तुकाराम माटे, गोविंद लंगडे, गोविंद माटे, बाबुराव क्षीरसागर, आनंदा सिनगारे, सौ.लांडगे आदी उपस्थित होते.