नागपूर - कोरोना विषाणूशी सारा देश लढा देत असताना यामध्ये अविरत सेवा देणाऱ्या आरोग्य सेवेतील प्रत्येक कर्मचाऱ्यांप्रति सध्या सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे. आरोग्य सेवेतील या प्रत्येक कर्मचाऱ्यांना सैन्य दलाकडून रविवारी मानवंदना देण्यात आली.
एकीकडे कोरोना विषाणूने संपूर्ण जगात आपले थैमान घातले असताना, दुसरीकडे जगभरातील आरोग्य विभाग, पोलीस विभाग, सफाई कर्मचारी आदी आपला जीव धोक्यात घालून देशसेवचे कार्य करत आहेत. भारतातही दिवसेंदिवस कोरोनाबाधितांची संख्या वाढत आहे. मात्र, त्यावर आळा घालण्यासाठी आरेग्य यंत्रणा अहोरात्र प्रयत्न करत आहे. त्यांच्या या कार्याला सलाम करणायाठी नागपूरात शासकीय मेडिकल रुग्णालय व इंदिरा गांधी रुग्णालय येथे वायू सेनेच्या बँड पथकाकडून आरोग्य सेवकांना मानवंदना देण्यात आली. डॉक्टर, नर्स, स्वच्छता कर्मचारी, पोलीस, सुरक्षा रक्षक, अत्यावश्यक सेवेतील कर्मचारी अशा सर्वांचाच यावेळी सन्मान करण्यात आला. शनिवारीदेखील वायुसेनेच्या बँड पथकाने झिरो माईल चौकातील गोवारी स्मारकाजवळसुद्धा कोरोना विरुद्धच्या लढतील फ्रंट वॉरिअर्सना मानवंदना देण्यासाठी विशेष सादरीकरण केले होते.