नागपूर - जिल्ह्यातील भिवापूर तालुक्याच्या वाकेश्वर गावात शेतकरी महिलेला अर्धनग्न करून मारहाण केल्याच्या प्रकरणात अखेर पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. शेतीवर कब्जा करण्याच्या वादातून शेतकऱ्याची पत्नी आणि सावकाराच्या पत्नीत धक्काबुक्की झाली होती. या घटनेचा व्हिडीओ वायरल झाल्यानंतर गुन्हा दाखल करण्याच्या मागणी जोर धरत असताना भिवापूर पोलिसांनी कथित सावकार अभय पाटील व त्यांच्या पत्नी विरोधात विविध कलमान्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटना सुमारे चार दिवसांपूर्वीची आहे. भिवापूर तालुक्याच्या वाकेश्वर गावातील शेतीवर कब्जा करण्याच्या वादातून तथाकथित सावकाराची पत्नी आणि कर्ज घेणाऱ्या शेतकऱ्याच्या पत्नीमध्ये शाब्दिक वाद झाल्यानंतर झटापट झाल्याचा एक व्हिडिओ वायरल झाला होता आहे. 2017 साली पाटील आणि शेतकरी यांच्यातील कर्ज प्रकरणातून ही घटना घडल्याचे बोलले जात आहे. शेतकरी दाम्पत्याने या घटनेच्या तीन दिवसानंतर पोलीस ठाण्यात तक्रार केल्यानंतर संपूर्ण घटनाक्रम पुढे आला होता.
भिवापूर तालुक्यातील वाकेश्वर गावातील (शेषराव चौधरी) या शेतकऱ्याने उमरेड येथे राहणारे अभयचंद्र पाटील यांच्याकडून 2 लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. कर्ज घेताना शेषराव चौधरी यांनी आपली दोन एकर शेती पाटील यांच्याकडे गहाण ठेवली होती.
मात्र, पाटील यांनी शेतकऱ्याला न कळता त्याची जमीन गहाण न ठेवता धोक्याने आपल्या नावाने नोंदणी करुन घेतल्याचा आरोप तक्रारदार चौधरी यांनी केला आहे. दोन वर्षानंतर जेव्हा शेतकरी कर्जाची रक्कम घेऊन गेला त्यावेळी या सावकाराने जमीन आपल्या मालकीची असल्याचे सांगितले.
दरम्यान, या वर्षी लवकर पाऊस दाखल झाल्यानंतर शेतकऱ्याने पत्नीसह शेतात जाऊन पेरणी केली. मात्र, या सावकारानं 20 जून रोजी ट्रक्टरने शेतकरी दाम्पत्याने केलेली पेरणी नष्ट केली. तसेच सावकाराने दोघांना शेतात येण्यास मज्जाव केला. सावकाराच्या पत्नीने शेतकऱ्यांच्या पत्नीला मारहाण केली, असा आरोप शेतकऱ्याच्या पत्नीने केला होता.
त्यावरुन भिवापूर पोलिसांनी कथीत सावकार अभय पाटील व त्यांच्या पत्नी विरोधात विनयभंग, मारहाण, धमकावणे, शिवीगाळ करणे, फसवणूक करणे असे विविध गुन्हे नोंदवण्यात आले आहेत. त्याचबरोबर महाराष्ट्र सावकारी नियमन अधिनियम 2014 च्या कलम 39, 41 आणि 45 अन्वये देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हेही वाचा - संतापजनक: सावकाराच्या पत्नीकडून शेतकऱ्याच्या पत्नीला अर्धवस्त्र करुन धक्काबुक्की, व्हिडिओ व्हायरल