मुंबई - भांडूप पूर्व येथील भांडूपेश्वर कुंडात बुडून एका २२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची घटना आज (बुधुवार) सकाळी उघडकीस आली. अंबादास तुकाराम चिंताले असे या तरूणाच नाव आहे. सदर युवक हा गणपती मूर्तीची आणि इतर अंगावरील कामे करून, स्वतःचा उदरनिर्वाह करत असल्याची प्राथमिक माहीती मिळाली आहे.
अंबादास हा भांडूपेश्वर कुंडा शेजारीच टाटा नगरात राहत होता. १४ जुलैला त्याने सायंकाळी चार ते साडेचारच्या दरम्यान त्याने कुंडात उडी मारली होती. परंतु, ही आत्महत्या आहे की दुर्घटना याचा तपास कांजूरमार्ग पोलीस करत आहेत.
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाला पाचारण करण्यात आले असून, अथक प्रयत्नानंतर मृतदेह पाण्यातून बाहेर काढण्यात यश आले. दरम्यान, मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रूग्णालयात पाठवण्यात आला असून, शवविच्छेदन अहवालानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल असे कांजूर पोलिसांनी सांगितले.