मुंबई - विमानतळावर पोटात अमली पदार्थाच्या 80 कॅप्सूल लपवून तस्करी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या 27 वर्षीय महिलेला अटक करण्यात आली आहे. सदर महिला व्हेनेझुएलाची नागरिक आहे. ही महिला 9 ऑगस्ट रोजी मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतराष्ट्रीय विमानतळावर साऊ पावलो येथून आली होती. तिच्या सामानाची झडती घेताना महिलेच्या हालचाली संशयास्पद वाटल्याने विमानतळावरील डीआरआयने सदर महिलेला ताब्यात घेतले.
चौकशी दरम्यान महिलेने तिच्या पोटात कोकेन या अमली पदार्थाच्या 80 कॅप्सूल असल्याची कबुली दिली. यानंतर एक्सरे तपासणी करण्याची सदर महिलेला जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले. जेजे रुग्णालयात उपचारादरम्यान या महिलेच्या पोटातून 80 कॅप्सूल काढण्यात आल्या, ज्यात उच्च प्रतिचे एकूण 796 ग्रॅम कोकेन होते.
या कोकेनची किंमत आंतराष्ट्रीय बाजारात तब्बल 4 कोटी 77 लाख इतकी आहे. दरम्यान, आरोपी महिलेला न्यायालयाने 20 ऑगस्ट पर्यंत न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.