मुंबई - केंद्रीय अर्थसंकल्प आज (शुक्रवार) सादर होणार आहे. अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वीच शेअर मार्केट तेजीत आहे. सेन्सेक्सने ४० हजार तर निफ्टीने ११ हजारांचा टप्पा गाठला आहे. आजचे बजेट गुंतवणूक क्षेत्र, उत्पादन क्षेत्र तसेच निर्माण क्षेत्रासाठी फायद्याचे असणार असल्याचे मत अर्थ तज्ञांनी व्यक्त केले आहे.
घरगुती खर्च वाढणार नसल्याचा अंदाजही व्यक्त करण्यात आला आहे. पहिल्यांदाच एक महिला केंद्राचे बजेट मांडत आहे. त्यामुळे एक महिला आपल्या देशाच्या कुटुंबाचा विचार करूनच बजेट सादर करील. याचा फायदा सर्वसामान्यांपासून सर्व स्तराच्या लोकांना होईल असे, आर्थिक निर्देशक व गुंतवणूकदारांनी मत व्यक्त केले आहे.
रेल्वे बजेटही वेगळे सादर होणार नाही. बजेटमध्ये रेल्वेमधील सोईसुविधा वाढवण्यावर भर असण्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. रेल्वेच्या सुधारणांसाठी व बदलासाठी चांगले निर्णय सरकार घेईल, मात्र त्यासाठी सेस आकारला जाण्याची शक्यताही तज्ञांनी व्यक्त केली.
आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर केंद्र सरकार राज्यांचा विचार करुन धोरणे ठरवेल. प्रत्येक राज्याला बजेटचा कसा फायदा होईल याचा विचार या अर्थसंकल्पात करण्यात येईल, असे तज्ञांनी सांगितले.