मुंबई - राहुल गांधी उद्या दाऊदला मांडीवर घेऊन बसणार आहेत का? असा सवाल शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला आहे. दक्षिण- मध्य मुंबईचे महायुतीचे उमेदवार राहुल शेवाळे यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.
ते म्हणाले, उद्या महाआघाडीला सत्ता दिली तर पंतप्रधानपदासाठी संगीतखूर्ची खेळावी लागेल. सगळ्या पक्षांनी आपले जाहीरनामे समोर ठेवा. हे काँग्रेसवाले राष्ट्रद्रोहाचे कलम रद्द करायला निघालेत. सैन्याचा विशेषाधिकार काढायला निघालेत. राहुल गांधी उद्या दाऊदला मांडीवर घेऊन बसणार आहेत का? असा सवाल त्यांनी यावेळी उपस्थित केला.
काही लोक सांगतात महायुतीला मते देऊ नका. मग मते का द्यायची नाही त्याचीही कारणे सांगा आणि कोणाला मत द्यायचे तेही सांगा. काँग्रेस-राष्ट्रवादीला सत्तेतून बाहेर फेकताना किती गुणाचे पुतळे आहेत ते जनतेला माहीत होते. आम्ही पाकिस्तानला धडा शिकवला म्हणून आम्ही नको असेल तर तसेही सांगा, अशा शब्दात उद्धव ठाकरेंनी राज ठाकरेंचे नाव न घेता मनसेवर प्रथमच पलटवार केला.
काही दिवसांनी ओवैसी धारावीत येणार आहे. सच्चा मुसलमान ओवेसीसोबत जाणार नाही. देशासाठी लढणारा औरंगजेब आमचा. स्वराज्यावर आक्रमण करणारा औरंगजेब आमचा नाही. आठवलेंचे सामान घरातून काढताना काँग्रेसला लाज वाटली नाही, असेही ते म्हणाले.
मेड इन धारावीचा ब्रँड जगात पोहोचवणार -
राहुल शेवाळे जिंकणारच आहे. आम्ही विजयाचे झंडे फडकवले कारण आमच्यासोबत आहेत आठवले, अशी काव्यमय सुरुवात ठाकरे यांनी केली. ते म्हणाले, तिकिटासाठी लोक काहीही बोलतात. निवडून येऊन अनेकांनी थापा मारल्या. राहुल शेवाळे सच्चा शिवसैनिक आहे. त्याने ५ वर्षात काम करुन दाखवले. धारावी पुनर्विकासाच्या उद्घाटनाला मी हजेरी लावणार आहे. मेड इन धारावीचा ब्रँड जगात पोहचवणार आहे. काँग्रेस आघाडीच्या काळात मुंबईचे प्रकल्पच मंजूर होत नव्हते. लाज वाटते हा प्रश्न कोण विचारतोय? काँग्रेस-राष्ट्रवादीने लाजेवर का बोलावे असे ठाकरे म्हणाले.
धारावीकरांच्या आशा-आकांशा पूर्ण करण्याला प्राधान्य - राहुल शेवाळे
राहुल शेवाळे म्हणाले, धारावीकरांच्या आशा-आकांशा पूर्ण करण्याला माझे प्राधान्य आहे. धारावी पुर्नविकास हे बाळासाहेब ठाकरेंचे स्वप्न होते. माझा जन्म धारावीत झाला. धारावीकरांना ३५० स्क्वेअर फुट घरांचा प्रस्ताव मंजूर केला. विमानतळ प्राधिकारणचा फनेल झोन आणि सीआरझेड प्रश्न सुटला आहे. टेंडर नव्याने मंजूर होणार आहे. पुर्नविकासासाठी रेल्वेने जागा दिली. महिनाभरात धारावी पुनर्विकासाचे काम सुरू करणार आहोत. मेक इन धारावीचा ब्रँड करणार आहोत. गायकवाड कुटुंबाने ४५ वर्षे धारावी वाऱ्यावर सोडली, असा आरोप शेवाळेंनी केला.