मुंबई - कोरोनाची दुसरी लाट आता कुठे नियंत्रणात येते न येते तोच आता लवकरच तिसरी लाट येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र राज्य कोविड टास्क फोर्सने दिला आहे. येत्या दोन आठवड्यात तिसरी लाट येणार असून यात 10 टक्के लहान मुले बाधित होतील असेही टास्क फोर्सने म्हटले आहे. टास्क फोर्सने हा इशारा दिला असताना केंद्र सरकारने मात्र तिसऱ्या लाटेची शक्यता नाकारली आहे. केंद्र सरकारने शक्यता नाकारली असली तरी राज्यातील तज्ज्ञांनी टास्क फोर्सच्या विधानाला दुजोरा दिला आहे. लसीकरण मंद गतीने सुरू असून अनलॉकमध्ये नागरिक कॊरोना प्रतिबंधक नियमांचे पालन करत नाहीत. त्यात कॊरोनाचा नवा डेल्टा व्हेरियंटचा शिरकाव झाला आहे. त्यामुळे जुलैअखेरीस तिसरी लाट येण्याची दाट शक्यता तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे.
'टास्क फोर्स'ने दिला 'हा' इशारा
मार्च 2020 मध्ये भारतात कोरोनाचा शिरकाव झाला. त्यानंतर कॊरोनाचा कहर प्रचंड वाढला. हजारो रुग्ण कॊरोनाचे बळी ठरेल. डिसेंबर मध्ये दुसरी लाट ओसरण्यास सुरुवात झाली. पण मार्च 2021 मध्ये कोरोनाचा कहर पुन्हा वाढला. रुग्ण संख्या झपाट्याने वाढली. मृत्यूदर वाढला. आता केंद्र सरकार आणि राज्य सरकारने तिसरी लाट नियंत्रणात आणली आहे. रुग्ण संख्या कमी होत आहे. असे असताना तिसरी लाट येत्या दोन आठवड्यात येणार असल्याचा इशारा महाराष्ट्र कोविड टास्क फोर्सने दिला आहे. तिसरी लाट सप्टेंबर मध्ये येणार असल्याचे म्हटले जात असताना आता टास्क फोर्सने जुलैच्या पहिल्या-दुसऱ्या आठवड्यातच तिसरी लाट येणार असल्याचा इशारा दिला आहे. तर या लाटेत सक्रिय रुग्णांचा आकडा 8 लाखांपर्यंत जाईल. सक्रिय रुग्णांमध्ये 10 टक्के रुग्ण हे 0 ते 18 वयोगटातील असतील असा ही इशारा टास्क फोर्सने दिला आहे.
केंद्र सरकार म्हणते तिसरी लाट नाही!
महाराष्ट्र राज्य टास्क फोर्सने दोन आठवड्यात तिसरी लाट येईल असा इशारा दिला आहे. पण केंद्र सरकारच्या राष्ट्रीय लसीकरण तांत्रिक सल्लागार समितीच्या कार्यगटातील काही सदस्यांनी मात्र ही शक्यता फेटाळून लावली आहे. टास्क फोर्सच्या या विधानाला कोणत्याही शास्त्रीय निरीक्षणाची जोड नसल्याचे म्हणत तिसरी लाट येणार नसल्याचे स्पष्ट केले आहे.
यामुळे तिसरी लाट येणार?
टास्क फोर्सची शक्यता केंद्र सरकारने फेटाळून लावली आहे. पण, राज्यातील तज्ज्ञ डॉक्टर टास्क फोर्सचा इशारा खरा असल्याचे म्हणत आहेत. इंडियन मेडिकल असोसिएशन, महाराष्ट्रचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांनी जुलै-ऑगस्टमध्ये तिसऱ्या लाटेचा कहर असेल असे स्पष्ट केले आहे. तर पाच महिन्यांत केवळ 5 टक्के लसीकरण पूर्ण झाले आहे, लसीकरणाचा वेग मंदावला आहे, सर्वत्र निर्बंध शिथिल झाले असून नागरिकांनी कॊरोनानियमांना हरताळ फासण्यास सुरवात केली आहे तर डेल्टा व्हेरीयंटचे रुग्ण आढळू लागले आहेत. या पार्श्वभूमीवर तिसरी लाट येण्याची शक्यता दाट झाल्याचे डॉ. भोंडवे यांनी स्पष्ट केले आहे. तर टास्क फोर्सचे सदस्य डॉ. अविनाश सुपे यांनी ही जुलै अखेरीस तिसरी लाट येईल असा इशारा दिला आहे. लसीकरणाचा वेग आपण या एक-दोन महिन्यांत वाढवला आणि जास्तीत जास्त नागरिकांना पहिला डोस दिला तरी आपण तिसरी लाट थोपवू शकतो असेही डॉ सुपे यांनी सांगितले आहे.
हेही वाचा - शिवसेनेचा 55वा वर्धापन सोहळा : पक्षप्रमुख उद्धव ठाकरे शनिवारी ऑनलाइनच्या माध्यमातून संबोधन