मुंबई - कोरोना काळात आपली सेवा देत असताना, एसटी महामंडळातील 106 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला. मात्र, मृतांच्या वारसांना अद्याप अनुकंपावर नोकरी देण्यात आलेली नाही. यामुळे आज मृत्यू पावलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाची अक्षरशः वाताहात सुरू आहे. याबाबतचे वृत्त 'ईटीव्ही भारत'ने दिले होते. त्यानंतर आता एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून मृत कुटुंबियांच्या वारसांची माहिती सर्व विभागातून मागितली आहे.
4 हजार कर्मचाऱ्यांना कोरोनाची बाधा
कोरोना काळात आपल्या स्वतःच्या जीवाची व कुटुंबियांची पर्वा न करता, एसटी महामंडळाचे कर्मचारी आपली सेवा देत होते. या काळात राज्यभरात आपली सेवा देत असताना 4 हजार 193 कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाली होती. यामध्ये 106 कर्मचाऱ्यांच्या मृत्यू झाला आहे. मृतांच्या वारसदारांना अनुकंपा तत्त्वावर तत्काळ घेणे गरजेचे होते. मात्र, एसटी महामंडळाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निष्काळजीमुळे अनुकंपा तत्वावरील नोकर भरतीस स्थगिती दिली होती. एसटी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती अत्यंत हालाखीची आहे. या कोरोना काळात उदरनिर्वाह कसा करायचा असा प्रश्न त्यांना पडला होता. याबाबतचे वृत्त सर्व प्रथम 'ईटीव्ही भारत'ने प्रकाशित केले होते. त्यानंतर झोपलेल्या एसटी महामंडळाला खडबडून जाग आली आहे.
सर्व विभागाला आदेश
कोरोना काळात 106 कर्मचाऱ्यांचा मृत्यू झालेला असून यातून फक्त अकरा मृत्यू कर्मचारी 50 लाख रुपयांचा मदतीसाठी पात्र ठरले. याउलट या अकरा कर्मचाऱ्यांपैकी अद्यापही तीन कुटुंबांना आर्थिक मदत मिळाली नाही. महत्त्वाची बाब सर्व मृत कर्मचाऱ्यांचा वारसांना अनुकंपा तत्त्वावर तत्काळ नोकरीत सामावून घेण्याची गरज होती. मात्र, परिवहन मंत्र्यांच्या घोषणेनंतरही काही अधिकाऱ्यांनी मनमानी करत सर्वसामान्य नोकरभरतीसह अनुकंपा तत्त्वावरील नोकर भरतीलाही स्थगिती दिली आहे. 'ईटीव्ही भारत'च्या वृत्तानंतर कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एसटी कर्मचाऱ्यांच्या वारसदारांची माहिती राज्य परिवहन महामंडळात अनुकंपा तत्वावर नोकरीसाठी देण्याचे आदेश सर्व विभागाला देण्यात आले आहे.
अधिवेशनात येणार मुद्दा
एसटी महामंडळाच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या एका वर्षात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मृत्यू पावलेल्या एसटी कर्मचाऱ्यांचा कुटुंबातील वारसांना नोकरी का देण्यात आली नाही, दिली असेल तर किती जणांना अनुकंपा तत्वावर नोकरी दिली, यासर्वांचा लेखा जोखा महाराष्ट्र विधिमंडळात समोर सादर करायचा आहे. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मध्यवर्ती कार्यालयाकडून सर्व कार्यशाळा व विभागांना पत्र पाठवून तत्काळ माहिती मागविण्यात आलेली आहे. त्यामुळे अनुकंपाचा मुद्दा अधिवेशनात येणार असून यावर वादळी चर्चा होणार असल्याची माहिती समोर येत आहे.
हेही वाचा - महिलेल्या फसवलेल्या 'त्या' आमदाराची सीआयडी चौकशी करा - प्रविण दरेकर