मुंबई - 'त्या' कायद्यात वेळ निश्चित नसल्याने त्याचा फायदा घेऊन राज्यपालांनी विधानपरिषदेच्या १२ आमदारांच्या नियुक्तीचा निर्णय अनिर्णित ठेवला असल्याचे मत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी व्यक्त केले. दरम्यान, जनहित याचिकेवर न्यायालयाने विचारल्यानंतर त्यावर निर्णय राज्यपाल घेतील व न्यायालयाला कळवतील, असा विश्वासही नवाब मलिक यांनी व्यक्त केला.
हेही वाचा - सहा महिन्यांनंतरही १२ आमदारांची नियुक्ती का नाही? हायकोर्टाचा राज्यपालांना सवाल
विधानपरिषदेवर १२ आमदारांच्या नियुक्तीबाबत कॅबिनेटने राज्यपालांकडे शिफारस केली होती. या घटनेला सात महिने होत आले तरी निर्णय घेतलेला नाही. मात्र, जनहित याचिकेवर सुनावणी करताना न्यायालयाने ही फाईल ड्रॉवरमध्ये ठेवण्यासाठी आहे की, निर्णय घेण्यासाठी, अशी विचारणा केली. त्यामुळे, आता राज्यपाल काय निर्णय घेणार याची वाट पहावी लागणार असल्याचे देखील नवाब मलिक यांनी सांगितले.
यावर, राज्यापाल यांनी विधान परिषद आमदार नियुक्तीबाबत इतक्याच कालावधीत निर्णय घ्यावा, असा कायदा नाही. राज्यपाल काहीच निर्णय घेत नाहीत, असा अर्थ काढणे चुकीचे असल्याचे आमदार आशिष शेलार म्हणाले. न्यायालयाच्या भूमिकेबाबत मी काही बोलू शकत नाही. मात्र, काही लोकं राज्यपालांवर बोलत आहेत, हे चुकीचे आहे, असे म्हणत नवाब मलिक यांच्या वक्तव्याचे त्यांनी खंडन केले.
हेही वाचा - बार्ज पी -305 चा कॅप्टन राकेश बल्लव अजूनही बेपत्ता, समुद्रात मारली होती उडी