मुंबई- पालिकेद्वारे मलनिस्सारण वाहिकेच्या कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्ड्यात पडून दहावीचा विद्यार्थ्यी गंभीर जखमी झाला आहे. ही घटना घाटकोपर पश्चिम येथील कातोडी पाडा येथे घडली. विवेक घडशी असे जखमी झालेल्या विद्यार्थ्याचे नाव असून या प्रकरणी दोषी कंत्राटदार आणि पालिका अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी केली आहे.
घाटकोपर पश्चिम येथे पालिकेच्या वॉर्ड क्र. १२७ मध्ये स्थानिक नगरसेवक सुरेश पाटील यांच्या प्रयत्नातून गणेश नगर ते कातोडी पाडा, असे मलनिस्सारण वाहिकेचे काम केले जात होते. त्यासाठी कंत्राटदारामार्फत खड्डा खोदण्यात आला होता. या खड्ड्याच्या बाजूला नियमाप्रमाणे बॅरिकेड्स लावावे लागतात. मात्र, कंत्राटदाराने बॅरिकेड्स लावले नाही. दरम्यान, दहावीची परीक्षा देऊन विवेक घडशी हा विद्यार्थ्यी सायकलवरून या परिसरातून जात होता. खड्ड्याजवळून जाताच विवेक याचा तोल गेला व तो खड्ड्यात पडला आणि त्या ठिकाणी असलेली सळी त्याच्या डोळ्यात घुसली. या अपघातामुळे त्याच्या चेहऱ्यावरही खोलवर जखमा झाल्या आहेत. त्याला पालिकेच्या केईएम रूग्णालयात दाखल करण्यात आले असून त्याची प्रकृती गंभीर आहे.
या अपघातामुळे विवेकला दहावीच्या परीक्षेलादेखील मुकावे लागले आहे. त्याचा डोळाही निकामी होण्याची शक्यता आहे. पालिकेचे आयुक्त अशा बेजबाबदार पालिका अधिकारी व ठेकेदारांवर कारवाई करणार का, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. दरम्यान, घटनास्थळी या विभागातील भाजपच्या माजी नगरसेविका रितू तावडे यांनी भेट दिली असून संबंधित कंत्राटदार अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे. संबंधित कंत्राटदाराला काळ्या यादीत टाकावे, अशी मागणीही तावडे यांनी केली.
हेही वाचा- चुकीचं काम केल्यास वाभाडे, चांगल काम केलं तर कौतुकही - राज ठाकरे