मुबंई - राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते १०० व्या अखिल भारतीय नाट्य संमेलनाच्या बोधचिन्हाचे अनावरण आज (गुरुवार) करण्यात आले. १०० वे नाट्यसंमेलन असल्याने त्याला एक वेगळेच महत्त्व असल्याचे पवार म्हणाले. तसेच संमेलनाची नांदी महाराष्ट्राबाहेरही पोहोचली असल्याचे पवार यावेळी म्हणाले.
यंदाच्या नाट्य संमेलनाचे उद्घाटन हे जागतिक रंगभूमी दिनी म्हणजेच २७ मार्चला सांगलीमध्ये होणार आहे. नाट्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रसिद्ध दिग्दर्शक डॉ. जब्बार पटेल यांची निवड करण्यात आली आहे. मी नाट्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदाची जबाबदारी घेतली असल्याचे पवार म्हणाले. तंजावर प्रांतातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्यातील वंशज श्रीमंत छत्रपती शहाजी राजे दुसरे हेही या संमेलनाला येणार असल्याची माहिती मिळाल्याचे पवार म्हणाले.
एकदा तंजावरला गेलो असता मोडी लिपीतील मोठा ऐतिहासिक ठेवा सरस्वती ग्रंथालयांमध्ये पहावयास मिळाला. ग्रंथालयातील मोडी प्रतींची अवस्था काळाच्या ओघात तितकीशी चांगली नव्हती. महाराष्ट्र राज्याचा प्रमुख असल्याने त्या ऐतिहासिक दस्ताच्या संवर्धनाचा निर्णय घेतल्याची आठवण आज होत असल्याचे पवार यावेळी म्हणाले. यावेळी मराठी नाट्य परिषदेचे अध्यक्ष प्रसाद कांबळी कोषाध्यक्ष जगन्नाथ चितळे, ज्येष्ठ रंगकर्मी सई परांजपे, बोधचिन्हाचे कर्ते मिलिंद प्रभू यांच्यासह नाट्यक्षेत्रातील कलाकारांची उपस्थिती होती.