मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्येप्रकरणी चर्चेत असलेले बिहारचे पोलीस महासंचालक गुप्तेश्वर पांडे यांची स्वेच्छानिवृत्ती आणि संभाव्य राजकीय उमेदवारीवरून काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी भाजपावर जोरदार टीकास्त्र सोडले आहे.
महाराष्ट्राची बदनामी करण्यासाठी बिहारचे डीजीपी यांना निर्लज्जपणे हे बक्षीस देण्यात आले. भाजपला सुशांत बद्दलकधीच सहानुभूती नव्हती. फक्त बिहारच्या निवडणुकांसाठी आणि आता नव्या फिल्म सिटीसाठी त्यांचा मृत्यूचे राजकारण करण्याची राजकीय संधी साधल्याची टीका सचिन सावंत यांनी केली आहे. इतके दिवस मुंबई पोलिसांना सुशांत आत्महत्येवरून दोषी ठरवणाऱ्या भाजपच्या नेत्यांनी आता सुशांतच्या मृत्यूची घटना बाजूला ठेवली आहे. कथित बॉलिवूड कनेक्शन म्हणजे एक बहाणा आहे. या माध्यमातून बॉलिवूडला बदनाम करण्याचा डाव असल्याचे सावंत यांनी म्हटले आहे.
सचिन सावंत यांनी एनसीबीला प्रथम उत्तर देण्याचे आव्हान दिले आहे. बॉलिवूड ड्रग कनेक्शन तपासणीसाठी एनसीबीला आमची हरकत नसली तरी, एनसीबीचे मुंबईत कार्यालय आहे, त्यांनी आधी याची चौकशी का केली नाही असा प्रश्न सावंत यांनी उपस्थित केला आहे. दुसरे म्हणजे सुशांत मृत्यू प्रकरणात दाखल एफआयआर १५/२०२० नुसार एनसीबीने अद्याप एकही अटक केलेली नाही. यात एफआयआर १६/२०२० नुसार सर्वांना अटक करण्यात आली असून त्यांंच्यावर अमली पदार्थांचे सेवन केल्याचा आरोप आहे. मात्र, सुशांत प्रकरणाशी त्याचा संबंध नाही. तसेच, एनसीबीने एसएसआर प्रकरण का सोडले हे आम्हाला स्पष्ट करावे आणि एनसीबीकडे ड्रग्ज आणि फिल्म इंडस्ट्रीचे संबंध सिद्ध करणारी किंवा कारवाई करण्यायोग्य माहिती आहे की नाही, हे सरकारने जाहीर करावे असे त्यांनी म्हटले आहे.
हेही वाचा - सुशांतसिंह आत्महत्या प्रकरण : जया साहाची नारकोटिक्स ब्युरो करणार सलग तिसऱ्या दिवशी चौकशी