मुंबई - देशभरामध्ये कोरोना विषाणूचे संकट उभे राहिले असून सर्वत्र संचारबंदी लागू असताना मुंबईच्या गोवंडी या उपनगरातील शिवाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरून सोमवारी सायंकाळच्या सुमारास दोन गटात वाद झाला. हा वाद विकोपाला गेला आणि जमावाने दोन युवकांची धारधार हत्याराने हत्या केली. या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे
शिवाजीनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पालिका हायस्कूल रस्ता क्रमांक 8 जवळ एक पाणपोई बसवण्यासाठी शेरू आणि अमीन या दोन युवकांत दोन दिवसापासुन वाद सुरू होता. ही माहिती परिसरात समजताच सोमवारी पुन्हा एकदा पाणपोईचा वाद विकोपाला गेला आणि याचे पर्यवसान हाणामारीत झाले.
सायंकाळी दोन गट समोरासमोर आले आणि एका गटातील 5 ते 6 जणांनी तलवार, चाकू व कुऱ्हाडीने दुसऱ्या गटावर हल्ला केला. यात 3 युवक गंभीर जखमी झाले होते. त्याना जवळील रुग्णालयात उपचारासाठी दाखल केल्यानंतर डॉक्टरानी दोघांना मृत घोषित केले. एका जखमीवर रुग्णालयात उपचार घेत असून या घटनेतील मृत व जखमी युवकांचे नाव अद्याप समजू शकले नाही. याप्रकणी शिवाजीनगर पोलीस अधिक तपास करीत आहेत.