मुंबई - मुंबईतील ६ लोकसभेच्या जागांसाठी २९ एप्रिलला मतदान होणार आहे. यासाठी सुरक्षेच्या दृष्टिकोनातून मुंबई पोलिसांनी आपली कंबर कसली आहे. मुंबई शहर जिल्ह्यात लोकसभेच्या २ जागांवर तर मुंबई उपनगर जिल्ह्याच्या ४ जागा, अशा एकूण ६ जागांसाठी मतदान होत आहे. यासाठी मुंबई पोलिसांनी सुरक्षेचा आढावा घेत, बंदोबस्तात वाढ केली आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्बब्लास्टच्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी सर्व पोलीस ठाणे व तपास यंत्रणांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. मुंबई शहरात कोणतेही असुरक्षित बूथ नसून तब्बल ३२५ मतदान केंद्र संवेदनशील म्हणून घोषित करण्यात आली आहेत.
मुंबईच्या रस्त्यावर २९ एप्रिलला ४० हजार ४०० पोलिसांचा बंदोबस्त असून याबरोबरच सिपीएमएफच्या १४ कंपन्या, तर एसआरपीएफच्या १२ कंपन्या, ६ हजार होमगार्ड यासह फोर्स वन, क्यूआरटी पथक, असॉल्ट पथक व एटीएसची टीम बंदोबस्तासाठी असणार आहे.