मुंबई - राज्यातील महिला सक्षमीकरण आणि त्यांच्या प्रश्नावर विधानपरिषदेत सभापतींकडून आणण्यात आलेल्या प्रस्तावावर विरोधकांनी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. त्यातच मुख्यमंत्र्यांनी दिलेल्या उत्तरावर जोरदार आक्षेप घेतल्याने सभागृहात गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते.
विधानपरिषदेत महिलांच्या सक्षमीकरणावर चर्चेला सुरुवात करताना उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सुरुवातीला महिला सदस्या बोलतील आणि त्यानंतर इतर सदस्य बोलतील अशी घोषणा केली. मात्र, त्याच दरम्यान विरोधीपक्ष नेते प्रवीण दरेकर यांनी उठून एका आमदाराच्या सुनेचा छळ होत असल्याचा मुद्दा समोर आणला. त्यावर सत्ताधारी पक्षासोबतच संसदीय कामकाज मंत्र्यांनी आक्षेप घेतले.
महिला प्रस्तावावरील या चर्चेचा विरोधकांकडून अपमान केला जात असल्याचे अनिल परब म्हणाले. मात्र, सभागृहात गोंधळ सुरू झाल्याने सुरुवातीला सभापतींनी १० मिनिटे सभागृहाचे कामकाज तहकूब केले. त्यानंतर सभापतींनी शिवसेनेच्या मनिषा कायंदे यांना बोलण्याची संधी दिली. मात्र, मधेच विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी आमदाराच्या सुनेच्या छळाचा विषय काढत यावर अगोदर आमच्या सदस्यांना बोलू देण्याची मागणी केली. त्यावर संसदीय कामकाज मंत्र्यांनी आक्षेप घेतले. तर मध्येच काँग्रेसचे सदस्य प्रा. जनार्धन चांदूरकर यांनी हा प्रस्ताव सभापतींच्या मार्फत आलेला प्रस्ताव असल्याने या प्रस्तावावर नियमाप्रमाणे विरोधी पक्षाला सुरुवातीला बोलता येत नाही, असे सांगितले. यामुळे सभागृहात पुन्हा गदारोळ सुरू झाला. यामुळे उपसभापतींनी मी मागील १८ वर्षांत असे एकदाही पाहिले नसल्याची खंत व्यक्त केली. तर चांदूरकरांना कोणत्या नियमाखाली आपण बोलायला दिले हे सांगा, अशी मागणी भाजपच्या भाई गिरकर यांनी लावून धरली. यामुळे संसंदीय कामकाज मंत्र्यांनी पॉईंट ऑफ प्रोसीजर प्रमाणे बोलता येते, परंतू, सदस्य बोलताना त्यावर त्यांना थांबवून दुसऱ्या सदस्यांना बोलण्याची प्रथा तुम्ही सभागृहात आणू नका अशी विनंती केली.
कायंदे यांच्यानंतर हुस्नबानू खलिफे आणि स्मिता वाघ या बोलल्या. तर राष्ट्रवादीच्या विद्या चव्हाण या बोलण्यासाठी उभे राहणार इतक्यात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उभे राहिले आणि त्यांनी महिलांच्या प्रस्तावावर उत्तर दिले. मुख्यमंत्र्यांच्या उत्तरावर विरोधकांनी जोरदार आक्षेप घेतले. मुख्यमंत्र्यांनी प्रस्तावावर उत्तर दिले की, प्रसाद लाड यांनी सांगितलेल्या विषयावर उत्तर दिले, असा सवाल विरोधी पक्षनेत्यांनी केला. त्यावर उपसभापतींनी संभ्रम राहू नये म्हणून मुख्यमंत्र्यांनी उत्तर दिले असल्याची माहिती दिली. तर भाई गिरकर यांनी उपसभापतींनाच अनेक वर्षानंतर महिलांच्या सन्मानाचा विषय आला होता. परंतू, तुम्ही कुठल्या नियमाप्रमाणे असे मुख्यमंत्र्यांचे उत्तर चालवता, असा सवाल केला.