मुंबई - सध्या मध्य रेल्वे हा हेरिटेज(वारसा) महिना साजरा करत असून या अंतर्गत नेरळ-माथेरान ही मिनी ट्रेन नव्या रंगात पर्यटकांच्या भेटीला येणार आहे. स्टीम लोको इंजिनसह पारदर्शक काच (विस्टाडोम) असलेला डब्याचे शनिवारी उद्घाटन होणार आहे.
‘माथेरान क्वीन’ असे नाव असलेल्या या डब्याच्या बाहेरील बाजूस नैसर्गिक चित्रे लावण्यात आली आहेत. त्यावर पक्षांच्या हालचालीची छायाचित्रे चिकटवण्यात आल्याने गाडीला वेगळेच रुप मिळाले आहे. या विस्टाडोम बोगीमध्ये एकूण ४० आसनाची व्यवस्था आहे. शिवाय बोगीच्या मागील बाजूस मोकळी जागा ठेवण्यात आली आहे. शनिवारपासून जोडण्यात येणाऱ्या या विस्टाडोम डब्यात अनेक अत्याधुनिक सोयी सुविधांचा समावेश आहे. पारदर्शक काचा असलेल्या मोठ्या खिडक्या हे या कोचचे वैशिष्ट्य आहे. यामुळे प्रवाशांना घाट परिसरातील निसर्ग सौंदर्य न्याहाळता येणार आहे. कोचच्या आतून सेल्फीसाठी विशेष जागाकरण्यात आली आहे. विस्टाडोम कोचमुळे पर्यटकांच्या संख्येत वाढ होईल, अशी अपेक्षा रेल्वे व्यक्त केली आहे.
काय आहे खासीयत -
काचेच्या विस्तृत खिडक्या, पारदर्शक छत, आकर्षक रंग, नावीन्यपूर्ण अंतर्गत सजावट, आरामदायी आसनव्यवस्था, सुरक्षेसाठी सीसीटीव्ही कॅमेरा, रंगबेरंगी एलईडी विद्युत दिवे, पक्षांच्या हालचालीची छायाचित्रे, एलईडी टिव्ही स्क्रीन, नक्षीदार लाकडी फर्निचर अशा अनेक सुविधा या विस्टाडोममध्ये अंतर्भूत आहेत.