मुंबई - राष्ट्रवादीच्या शिवस्वराज्य यात्रेची सुरुवात मंगळवारी (६ ऑगस्ट) छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरीच्या पायथ्याशी असलेल्या जुन्नर या ऐतिहासिक नगरीपासून होणार आहे. ही शिवस्वराज्य यात्रा ६ ते २८ ऑगस्ट दरम्यान राज्यातील २२ जिल्हे, ८० तालुके आणि ३ हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहे.
शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमातून शिवस्वराज्य सनद सादर केली जाणार आहे. तर पक्षाचा जाहीरनामा महाराष्ट्रातील लोकांपर्यंत घेवून जाणार असल्याचे यावेळी जयंत पाटील यांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले.
ते म्हणाले, या यात्रेत बेरोजगार युवकांची नोंदणी केली जाणार असून त्यांच्या भविष्याचा विचार यातून सक्षमपणे केला जाणार आहे. तसेच युवकांच्या हाताला काम देणे, राज्यातील सगळ्या थरातील व्यवस्थेला मदत करण्याची ही या यात्रेची भूमिका असणार.
ही शिवस्वराज्य यात्रा कुठल्या पक्षाच्या विरोधात नाही. तर घोर फसवणूक, युवकांची निराशा यावर प्रकाश टाकण्यासाठी आणि रयतेच्या हितासाठी ही यात्रा असणार आहे. सर्व घटकांना न्याय देण्यासाठी राष्ट्रवादीच्यावतीने शिवस्वराज्याची सनद देवून आम्ही काय देवू इच्छितो यासाठी ही सनद घेवून जाणार असल्याचेही जयंत पाटील यांनी सांगितले.